World Environment Day 2019: अशी झाली जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात; काय आहे पर्यावरण दिनाचं महत्त्व आणि यंदाची थीम?
Happy World Environment Day 2018 (Photo Credits: File Image)

दरदिवशी समोर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनांचा अभ्यास केल्यास वाढतं प्रदूषण किंबहुना पर्यावरणाकडे केलं जाणारं दुर्लक्ष हे कारण प्रकर्षाने समोर येतं. ही बाब लक्षात घेऊन मागील पाच दशकांपासून 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day) साजरा केला जातो. या निमित्ताने विविध देशांमध्ये रॅली काढून , घोषणा देऊन, वृक्षारोपण करून पर्यावरणप्रेमी आनंद साजरा करतात. प्रतिवर्षीप्रमाणे यावेळी देखील एक खास थीम घेऊन आज याच उत्साहात भारतासह अनेक देशांमध्ये हा निसर्ग रक्षण सोहळा पार पडत आहे. यंदा 'Beat Air Pollution' ही थीम घेऊन जगभरातुन वायू प्रदूषणाला हटविण्याचा संदेश दिला जात आहे. यंदाचे या कार्यक्रमाचे यजमानपद चीनकडे देण्यात आलेले आहे.

जागतिक पर्यावरण दिन २०१९ (Watch Video)

यानिमित्ताने पर्यावरण दिनाची सुरवात का व कशी झाली याबद्दल जाणून घेऊयात..

पर्यावरण दिनाचे मुख्य उद्दिष्ट हे निसर्गाचे संवर्धन करणे असून संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे 1972 साली पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार 1973 मध्ये 5  जून या दिवशी स्वीडन मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ज्यामध्ये "Only one Earth" या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती. जागतिक स्तरावर सर्वात आधी यजमानपद मिळवणारा स्वीडन हा पहिला देश होता. तब्बल 119 देशांच्या सहभागात तेव्हा हा कार्यक्रम पार पडला. यानंतर दरवर्षी एका विशिष्ट समस्येला लक्ष्य करून व त्यावर आधारित थीम घेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी 'प्लास्टिक हटाव' या थीम अंतर्गत भारतात हा पर्यावरण दिन पार पडला. ज्यामध्ये भारताने 2022 पर्यंत भारतात संपूर्ण प्लास्टिक बंदी करणार असल्याची घोषणा केली. Electric Vehicles वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! 'हिरव्या नंबर प्लेट' सोबत मिळणार या सवलती

यंदाच्या थीमच्या अनुषंगाने भारतात देखील अनेक उपक्रम राबिवण्यात येणार आहेत.यानिमित्ताने काहीच दिवसांपूर्वी भारतीय पर्यावरण खात्यातर्फे सेलिब्रिटींना घेऊन तयार करण्यात आलेलं 'हवा आने दे' गाणं सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलं होतं. मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये पथनाट्य, जनजागृती कार्यक्रम, फ्लॅशमॉब सारख्या कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले आहे, सोबतच अनेक बॉलिवूडकर मंडळींनी देखील नागरिकांना या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन वायू प्रदूषणाला रामराम करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये दक्षिणेकडील राज्यांचा उत्साह हा खास उल्लेखनीय आहे.