निसर्गाच्या बाबतील भारतात प्रचंड विविधता आहे. नद्या, पर्वत, समुद्र, झाडे यांची अक्षरशः उधळण इथे झाली आहे. गंगा, यमुना, कृष्णा, क्षिप्रा यांसारख्या अनेक नद्यांची भारतात पूजा होते. मात्र यात एक नदी अशी आहे जी आजही शापित म्हणून ओळखली जाते. या नदीची कोणी पूजा करत नाही का कोणी तिची प्रार्थना करत नाही. ही नदी आहे चंबळच्या खोऱ्यातील चंबळ नदी (Chambal River). मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जानापाव येथे विंध्य पर्वतात तिचा उगम होतो. ही नदी मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश इथून वाहते.
बीहडच्या मध्यभागी देशातील एक सुंदर आणि स्वच्छ चंबळ नदी वाहते. ही भारताची एकमेव नदी आहे जी प्रदूषणमुक्त आहे, परंतु मानव किंवा एखादे जनावरही या नदीचे पाणी पीत नाही. चंबळला एक शापित नदी म्हणून ओळखले जाते. या नदीचा संदर्भ अगदी पुराणकाळात आढळतो. महाभारताशी या नदीचे नाते आहे. मुरैना जवळ याच नदीच्या काठावर शकुनीने पांडवांना द्युतामध्ये हरवले होते. याच ठिकाणी द्रौपदीच्या चीरहरणाचे आदेश दिले गेले होते. म्हणून चिडलेल्या द्रौपदीने या नदीला शाप दिला होता. अजूनही हा शाप प्रमाण मानून या नदीची पूजा केली जात नाही किंवा तिचे पाणी पिले जात नाही. (हेही वाचा: नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाला मगरीने जिवंत गिळले, परिसरात भीतीचे वातावरण)
या शापामुळेच या नदीच्या काठची लोकवस्ती अतिशय कमी आहे, म्हणूनच ही नदी अतिशय स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आहे. मध्य प्रदेशातील चंबळचे खोरे हे तेथील घनदाट अरण्य तेथे आश्रय घेऊन राहणार्या डाकूंसाठी कुप्रसिद्ध आहे. मात्र या नदीमुळे अनेक डाकू जास्त काळ इथे आश्रय घेऊ शकत नाही. कारण या परिसरात चंबळ हा एकच पाण्याचा स्त्रोत आहे. फुलनदेवीने बेगडी कांड नंतर याच परिसरात अनेक दिवस पाण्याविना काढले होते. मात्र शेवटी तिने पोलिसांच्या समोर शरणागती पत्करली.