दिवाळी हा नात्यांचा उत्सव आहे. आणि या उत्सवात सर्वात औत्सुक्याचा दिवस असतो तो म्हणजे भाऊबीजेचा. या दिवशी भावंडं कुठेही असली तरी तरीही वेळात वेळ काढून एकमेकांना भेटतात. भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीयेच्या दिवशी असतो.
जाणून घ्या भाऊबीजेच्या मागची कथा:
भाऊबीजेला 'यमद्वितीया' असे सुद्धा म्हटले जाते. त्यामागे एक कथा आहे. ती अशी की या दिवशी यमाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात, म्हणजे तसे करणाऱ्याला त्यावर्षी यमापासून भय नसते. तसेच यम आणि यमुना या भाव बहिणीच्या जोडगोळीबद्दल अशी कथा आहे की ज्या दिवशी यम वारला त्या वेळी यमीला इतके दुःख झाले की ती आपले रडणे थांबवू शकत नव्हती. तेव्हा शेवटी दिवस संपला हे सूचित करण्यासाठी परमेश्वराने रात्रीची निर्मिती केली आणि यमुनेचे भावाबद्दलचे दुःख काहीसे हलके होऊन तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने या दिवशी यमाची पूजा आणि प्रार्थना करावयाची असते.
बहीण भावाला ओवाळते आणि मस्तकी टिळा लावते. यमाच्या पाशातून आपल्या प्रिय बंधूची व तो सुरक्षित राहावा हा यामागचा हेतू असतो. एखाद्या मुलीस जवळचा भाऊ किंवा अगदी दूरचा भाऊही नसल्यास तिने चंद्राला आपला भाऊ मानून त्याला ओवाळावे अशी पद्धत आहे.