सिएटल विद्यापीठातील (Seattle University) संशोधकांनी एका महत्त्वपूर्ण अभ्यासात मानवी लैंगिक आकर्षणाचा एक नवीन प्रकार ओळखला आहे, ज्याला 'सिम्बायोसेक्शुअलिटी' (Symbiosexuality) म्हणतात. आकर्षणाच्या पारंपारिक प्रकाराला छेद देऊन, सिम्बायोसेक्शुअलिटीमध्ये लोक आधीच रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांच्या नात्याकडे आकर्षित होतात. म्हणजेच सिम्बायोसेक्शुअल लोक एका व्यक्तीकडे आकर्षित होत नाहीत, तर इतर लोकांच्या नातेसंबंधातील सामायिक केलेली ऊर्जा, नात्यातील बहुआयामी पैलू आणि त्यातील सामर्थ्य यांच्याकडे आकर्षित होणे या प्रकारात समाविष्ट आहे. सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर, एखाद्या जोडप्याचे प्रेम पाहून जेव्हा तिसऱ्या व्यक्तीला लैंगिक ऊर्जा मिळते तेव्हा त्याला सिम्बायोसेक्स्युॲलिटी म्हणतात.
आकर्षणाच्या या प्रकाराने तज्ञांना मानवी आकर्षण आणि इच्छेच्या पारंपारिक कल्पनांवर पुनर्विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. 'अर्काइव्ह्ज ऑफ सेक्शुअल बिहेविअर' मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातील निष्कर्षांनुसार, सिम्बायोसेक्शुअलिटी ही विविध वयोगट, वेगवेगळी वांशिक पार्श्वभूमी असलेले लोक, विविध सामाजिक-आर्थिक वर्गातील लोक तसेच वेगवेगळ्या लिंगाच्या लोकांमध्ये दिसून आली आहे. या अभ्यासाचे नेतृत्व केलेले मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्राच्या सहायक प्राध्यापक, डॉ. सॅली जॉन्स्टन यांच्यामते मानवी लैंगिकता ही जितकी समज आहे त्यापेक्षा अधिक जटिल आहे.
सिम्बायोसेक्शुअलिटी असलेले लोक कोण आहेत?
अभ्यासानुसार, सिम्बायोसेक्शुअलिटी व्यक्तींना एखाद्या रोमँटिक जोडप्याबद्दल भावनिक, शारीरिक आणि लैंगिक आकर्षण वाटते. हे आकर्षण केवळ एका व्यक्तीबद्दल नाही तर त्यांच्या संपूर्ण नात्याबद्दल आहे. असे लोक इतर जोडप्यांमधील प्रेम, समन्वय आणि लैंगिक आकर्षण पाहतात आणि त्यांच्या प्रेमात सामील होण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण होते.
डॉ. जॉन्स्टन यांनी न्यू यॉर्क पोस्ट सोबत बोलताना नमूद केले की, जोडीदारनिष्ठ असलेल्या आणि नसलेल्या अशा दोन्ही समुदायांमध्ये सिम्बायोसेक्शुअल लोकांना नेहमीच टीकेचा सामना करावा लागतो. जोडीदारनिष्ठ नसलेल्या लोकांच्या समुदायामध्ये सिम्बायोसेक्शुअल लोकांना 'युनिकॉर्न' समजले जाते. युनिकॉर्न म्हणजे जोडप्यातील दोन्ही लोकांशी लैंगिक संबंध असलेली व्यक्ती. मात्र अशावेळी सिम्बायोसेक्शुअलिटी हा शब्द नकारात्मक अर्थ धारण करतो. सिम्बायोसेक्शुअलिटी अनुभव व्यक्तीपरत्वे बदलू शकतो. काही लोक केवळ जोडप्यांकडे पाहून आकर्षित होतात, तर अनेकांना जोडप्यांशी संवाद साधण्यात किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचे आकर्षण वाटते. त्याच वेळी, काहींना जोडप्यांशी शारीरिक संबंध ठेवण्यातही रस असतो.
अभ्यासकांनी केलेल्या संशोधनात 145 सहभागींचा समावेश होता, ज्यांनी सांगितले की त्यांना केवळ एका व्यक्तीकडेच नव्हे तर जोडप्याबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल आकर्षण वाटले. स्वतःला सिम्बायोसेक्शुअल समजणारे लोक हे आपण बहिर्मुखी, काळजी घेणारे, जोडप्याकडून जवळीकीची अपेक्षा असणारे लोक असल्याचे सांगतात. त्यांच्यामते त्यांच्या मनामध्ये कोणताही मत्सर नसतो. त्यांना फक्त एखाद्या जोडप्याकडून प्रेमाची आणि शारीरिक जवळकीची अपेक्षा असते.
सिम्बायोसेक्शुअलिटी समजून घेणे
अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे की, काही सहभागींनी, विशेषत: समलैंगिक आणि लैंगिकदृष्ट्या मुक्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांनी, आपण समलैंगिक आणि गैर-विषमलिंगी जोडप्यांकडे प्राथमिक आकर्षित असल्याचे नोंदवले. दरम्यान, या अभ्यासानंतर डॉ. जॉन्स्टनला नातेसंबंधांमधील या भावनेचा आणखी अभ्यास करायचा आहे, जेणेकरून ती लोकांना या प्रकाराबद्दल मानसिक आरोग्य आणि नातेसंबंध समाधानाच्या दृष्टीकोनातून अजून विश्लेषण करून सांगू शकेल.
मात्र सिम्बायोसेक्शुअलिटी मार्ग सोपा नाही. समाजात मान्यता नसलेली ही एक नवीन आणि कमी समजलेली संकल्पना आहे. तिचा समाजात स्वीकार करणे कठीण होऊ शकते. जोडप्यांसह नातेसंबंध निर्माण करणे सिम्बायोसेक्शुअल लोकांसाठी कठीण असू शकते, कारण ते सामान्य प्रकारच्या आकर्षणापेक्षा बरेच वेगळे आहे. यासह सिम्बायोसेक्शुअल व्यक्तीला त्यांच्या स्वतःच्या भावना आणि आकर्षण समजणे कठीण होऊ शकते, कारण ते एक जटिल आणि बहुआयामी अभिमुखता आहे.