Microplastics Detected In Human Testicles: पुरूषांच्या अंडकोषांमध्ये आढळले मायक्रोप्लास्टिक्स; प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो परिणाम, अभ्यासात धक्कादायक खुलासा
Microplastics Detected In Human Testicles

Microplastics Detected In Human Testicles: एका आश्चर्यकारक शोधात शास्त्रज्ञांना मानवी अंडकोषांमध्ये (Human Testicles) मायक्रोप्लास्टिक (Microplastics) सापडले आहे. न्यू मेक्सिको विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मानव आणि कुत्र्यांमधील टेस्टिक्युलर टिश्यूचा अभ्यास केला आणि प्रत्येक नमुन्यात मायक्रोप्लास्टिक्स आढळून आले. मात्र, कुत्र्यांपेक्षा मानवांमध्ये तीनपट जास्त मायक्रोप्लास्टिक आढळले. तपासणीत, शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, मानवांमध्ये 329.44 मायक्रोग्रॅम मायक्रोप्लास्टिक प्रति ग्रॅम ऊतीमध्ये आढळून आले, तर कुत्र्यांमध्ये 122.63 मायक्रोप्लास्टिक आढळले.

हे परिणाम ‘टॉक्सिकोलॉजिकल सायन्सेस’ जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. या अभ्यासात संशोधकांनी 23 मानवी अंडकोष आणि 47 कुत्र्यांच्या अंडकोषांची चाचणी केली.

या अभ्यासातून हे प्लास्टिकचे प्रदूषण मानवी शरीराच्या इतक्या नाजूक भागात कसे गेले, यासह या सूक्ष्म तुकड्यांचा पुरुष पुनरुत्पादनावर कसा परिणाम होऊ शकतो, याबद्दलही चिंता निर्माण झाली आहे. सायन्स अलर्टशी बोलताना, न्यू मेक्सिको विद्यापीठातील पर्यावरणीय आरोग्य शास्त्रज्ञ झियाओझोंग यू म्हणाले, ‘सुरुवातीला, मी मायक्रोप्लास्टिक्स प्रजनन व्यवस्थेत प्रवेश करू शकतो की नाही याबद्दल साशंक होतो. जेव्हा मला पहिल्यांदा कुत्र्यांमध्ये हे परिणाम मिळाले तेव्हा मला आश्चर्य वाटले. पण मी त्याहूनही अधिक आश्चर्यचकित झालो, जेव्हा मला मानवांमध्ये समान परिणाम आढळले.

पहा पोस्ट- 

या शोधामुळे शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, जगभरातील शुक्राणूंची संख्या कमी होण्यास प्लास्टिक जबाबदार असू शकते. अभ्यासासाठी 2016 मध्ये केलेल्या शवविच्छेदनातून विश्लेषण केलेले अंडकोष वापरण्यात आले. मृत्यूसमयी या व्यक्तींचे वय 16 ते 88 वर्षे दरम्यान होते. प्रोफेसर यू म्हणतात, ‘आज वातावरणात पूर्वीपेक्षा जास्त प्लास्टिक आहे, त्यामुळे तरुण पिढीवर त्याचा परिणाम अधिक चिंताजनक असू शकतो.’ अनेक दशकांपासून पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या संख्येत घट दिसून येत आहे. अनेक अभ्यासांमध्ये कीटकनाशकांसारखे रासायनिक प्रदूषण यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे. (हेही वाचा: Food Poisoning During Summer: उन्हाळ्यामध्ये होणारी अन्नातून विषबाधा टाळण्यासाठी खास Tips; ज्यामुळे वाढेल तुमची खाद्य सुरक्षा)

दुसरीकडे, 2023 मध्ये चीनमध्ये केलेल्या एका लहान अभ्यासात सहा मानवी अंडकोष आणि 30 शुक्राणूंच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळले. उंदरांवर केलेल्या अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की, मायक्रोप्लास्टिक्स शुक्राणूंची संख्या कमी करतात, त्यांच्यामध्ये विकृती निर्माण करतात आणि हार्मोन्समध्ये व्यत्यय आणतात. हा अभ्यास म्हणजे पर्यावरणातील प्लास्टिक प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत आणखी एक इशारा आहे.

दरम्यान, अलीकडेच मानवी रक्त, नाळ आणि स्तनदा मातांच्या दुधातही मायक्रोप्लास्टिक सापडले आहे, ज्यामुळे हे कण आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणावर पसरलेले असल्याचे सिद्ध होते. त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबद्दल अद्याप कोणतीही निश्चित माहिती नसली तरी, प्रयोगशाळांमध्ये केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की मायक्रोप्लास्टिक्स मानवी पेशींना हानी पोहोचवू शकतात. याशिवाय प्लॅस्टिकमध्ये असलेली रसायनेही हानी पोहोचवू शकतात. मार्चमध्ये, डॉक्टरांनी चेतावणी दिली की ज्या लोकांच्या रक्तवाहिन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स होते त्यांना स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि अकाली मृत्यूचा धोका लक्षणीय वाढतो.