Kojagiri Purnima 2023 Date: येत्या 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार कोजागिरी पौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्तासह धार्मिक महत्व
Sharad Purnima (Photo Credits: File Image)

हिंदू कॅलेंडरनुसार अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2023) म्हटले जाते. पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. ज्योतिषशास्त्रानुसार संपूर्ण वर्षात फक्त याच दिवशी चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो. म्हणूनच हिंदू धर्मात हा दिवस कोजागर व्रत म्हणून साजरा होतो. याला कौमुदी व्रत असेही म्हणतात. यंदा शनिवार 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाईल.

शरद पौर्णिमेला चंद्रातून निघणारी किरणे ही अमृत मानली जातात. म्हणूनच उत्तर भारतात या दिवशी खीर बनवून ती रात्रभर चंद्रप्रकाशात ठेवण्याची परंपरा आहे. दुसऱ्या दिवशी ही खीर प्रसाद म्हणून भक्षण केली जाते. देशात महाराष्ट्रासह इतर ठिकाणी या रात्री दूध आटवून बदाम, केशर, पिस्ता वगैरे सुकामेवा घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते मसाला दूध मग प्राशन केले जाते.

धार्मिक महत्व-

मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते. अशा परिस्थितीत जो कोणी या दिवशी आणि रात्री निशिता काल मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करतो, देवी लक्ष्मी त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. या दिवशी घर स्वच्छ ठेवावे असे सांगितले जाते. जेणेकरून देवी लक्ष्मी घरात प्रवेश करून निवास करू शकेल. या दिवशी करायच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजाही केली जाते.

शुभ मुहूर्त-

पंचांगानुसार, आश्विन महिन्याची पौर्णिमा 28 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे 04:17 वाजता सुरू होईल. पौर्णिमा तिथी 29 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे 01:53 वाजता समाप्त होईल. निशिता काळात कोजागर पूजा केली जाते. या दिवशी चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 05.20 वा आहे.

कोजागर पूजेची वेळ- 28 ऑक्टोबर 2023, रात्री 11.39 ते 29 ऑक्टोबर 2023, सकाळी 12.31 पर्यंत

पूजा पद्धती-

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून देवी लक्ष्मी आणि विष्णू देवाच्या पूजेची तयारी करावी. सर्वात प्रथम एका पाटावर लाल पिवळे कापड पसरून त्यावर देवी लक्ष्मी आणि विष्णू देवाची मूर्ती स्थापित करा. देवासमोर तूपाचा दिवा लावून गंगाजल शिंपडा आणि अक्षता, कुंकू वाहा. त्यानंतर देवाला फुले वाहून प्रार्थना करा. प्रसाद म्हणून खिरीचा नैवेद्य दाखवा. (हेही वाचा:  दिवाळीची पहिली आंघोळ, भाऊबीज कधी? पहा यंदा दिवाळीच्या 6 दिवसांच्या सेलिब्रेशनच्या तारखा)

दरम्यान, नवरात्र सुरू होण्यापूर्वी पितृपक्ष येतो आणि यात पितर पृथ्वीवर येतात. यावेळी पृथ्वीवर आलेल्या पितरांचे निवासस्थान चंद्रलोकात असते अशातच कोजागिरी पौर्णिमेच्या शीतलतेमुळे त्यांचा प्रवास सुखाचा होतो असा समज आहे. या तिथीला अनेक ठिकाणी नद्या किंवा कालव्यात दिवे सोडून पितरांना निरोप दिला जातो.

(टीप- लेखात दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. लेटेस्ली मराठी त्याची पुष्टी करत नाही)