नेहमी बाहेरचे खाणे? फूड पॉयझनिंग झाल्यास हे करा उपाय व अशी घ्या काळजी

आजकाल धकाधकीच्या काळात खाण्यापिण्यावर काही ताळतंत्र राहिले नाही. विविध कारणांनी बाहेरचे खाण्यावर भर वाढलेला दिसून येतो. सर्रास बाहेरचे खाणे, खाताना हेल्दी अनहेल्दी याचा विचार न करणे, स्वच्छतेची काळजी न घेणे अशा गोष्टींमुळे उलट्यांचा, पोटदुखीचा त्रास सुरु होतो. अन्नामध्ये असणाऱ्या बॅक्टेरियांमुळे होणारे इन्फेक्शन विविध आजारांसाठी कारणीभूत ठरते. तसेच रस्त्यावरील स्टॉल्सवरील खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर अश्या प्रकारे फूड पॉयझनिंग होते. काहीवेळा दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून, अर्धवट शिजविलेले आणि कच्चे मांसाहारी पदार्थ यांमुळेही फूड पॉयझनिंगचा त्रास उद्भवू शकतो. यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

काळजी - 

> सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंपाकघर आणि बाथरूमची नियमित स्वच्छता आवश्यक आहे. खाद्यपदार्थ हाताळताना हात, आणि त्याचबरोबर स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी, चॉपिंग बोर्ड, सुरी इत्यादी वस्तू स्वच्छ असतील याची खबरदारी घ्यावी.

> भाज्या किंवा फळे कच्ची खाण्यापूर्वी गरम पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये व्हिनेगर मिसळून त्यामध्ये काही काळ ठेऊन मगच खावीत

> कच्चे व शिजवलेले अन्नपदार्थ सीलबंद डब्यांमध्ये साठविले जावेत आणि फ्रीजमध्ये जास्त काळ न ठेवता लवकरात लवकर त्यांचा वापर करावा.

उपाय –

> फूड पॉयझनिंगमुळे पोटदुखी आणि जुलाब होऊ लागले, तर एक लसणीची पाकळी तोंडात ठेऊन चघळत राहावी, व त्यावर कोमट पाणी प्यावे.

> फूड पॉयझनिंग झाले असता, कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस घालून हे पाणी दिवसभर थोडे थोडे पीत रहावे. (हेही वाचा: प्रमाणात घेतलेल्या बिअरचे काही आश्चर्यचकित करणारे फायदे)

> एक ग्लास कोमट पाण्यामध्ये दोन मोठे चमचे अॅपल सायडर व्हिनेगर घालून त्याचे सेवन करावे. हे व्हिनेगर जेवणापूर्वी प्यावे.

> आलं हे अन्नपचनासाठी अतिशय फायदेशीर असते. फूड पॉयझनिंग झाल्यावर आलं घालून चहा प्या. आल्यामुळे फूड पॉयझनिंगची समस्या वाढवणाऱ्या बॅक्टेरीयांची वाढ होण्यास आळा बसतो.

फूड पॉयझनिंग झालेले असताना तेलकट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. त्याचबरोबर काही तास दुध, चहा किंवा कॉफी या पदार्थांचे सेवन करू नये. दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहावे.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)