
उन्हाळा (Summer) सुरु झाला असून उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही होत आहे. या मोसमात जास्त जेवण जात नाही वा ते खाण्याची इच्छा होत नाही. सतत पाणी आणि गार पेय पित राहावे असे वाटते. मात्र बाहेरच्या केमिकलयुक्त पेयांमुळे शरीरावर त्याचा विपरित परिणाम देखील होऊ शकतो. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला उन्हाळ्यात काय खावे (Summer Health Care Tips) आणि काय खाऊ नये याची माहिती असणे आवश्यक असते. ज्यामुळे शरीरावर त्याचा दुष्परिणाम न होता फायदा होईल.
शरीरातील उष्णता कमी करून थंडावा निर्माण करणारे पदार्थ खाणे गरजेचे आहे. ज्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया उत्तम राहील. अपचन, पित्त, उलट्या, डिहायड्रेशन यांसारख्या समस्या उद्भवणार नाहीत.
उन्हाळ्यात आहार कसा असावा?
- शरीरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी फळं आणि भाज्यांचे रस, सरबत आणि द्रवपदार्थांचं खूप सेवन केलं पाहिजे. मात्र हे घेताना यात साखर सेवन करू नये.
- खनिजक्षार आणि जीवनसत्व हे देखील खूप गरजेचे असतात. म्हणून शहाळ्याचं पाणी, लिंबूपाणी, ताक, दही, कैरीचं पन्हं यांचं सेवन करावं.हेदेखील वाचा- Summer Health Tips: उन्हाळ्यात ताक कधी आणि कसे प्यावे?
- उन्हाळ्यात शरीरातील मिठाचं आणि पाण्याचं प्रमाण योग्य राखण्यासाठी खूप पाणी प्यायला पाहिजे.
- काकडी, कांदा, कोथिंबीर, पुदिना, कलिंगड अशा जास्त प्रमाणात पाणी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
- उन्हाळ्यात पचायला हलका असा आहार घ्यावा. ज्वारी, नाचणी, मूग अशा थंड गुणधर्माची धान्यं जरूर खावीत. याचबरोबर गायीचं दूध, वरणभात, खिचडी असे सुपाच्य पदार्थांचं सेवन करावं.
- पचनक्रिया मंदावलेली असते तेव्हा जास्त तळलेले पदार्थ, मसाल्याचे पदार्थ, बेकरीतील उत्पादनं, जंक फूड, कार्बोनेट ड्रिंक्स यांचं सेवन वर्ज्य करावं. तसेच चह, कॉफी, अल्कोहोल अशा उष्णता वाढवणार्या पदार्थांचं सेवन करू नये.
- उन्हाळ्यात ताजे पदार्थच खावेत. शिळे अन्न अजिबात खाऊ नये. यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्यात रात्रीचा आहार वा जेवण हे कमी असावे. प्रमाणाबाहेर खाल्ल्यास तुमची पचनक्रिया बिघडू शकते. तसेच मांसाहारही सकाळी अथवा दुपारचा करावा. रात्री शक्यतो मांसाहार टाळावा.