Pillowcovers (Photo Credit : Pixabay)

Unwashed Pillowcovers and Bacteria: निरोगी राहण्यासाठी तुमचे खाणेपिणे तसेच तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी, परिसर स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये तुमच्या बेडरूम आणि बाथरूमची स्वच्छता एक महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र बहुतांश लोक याकडे लक्ष देत नाहीत. जो पर्यंत बेडशीट किंवा उशांचे कव्हर (Pillowcovers) मळकट दिसत नाहीत, तोपर्यंत ती बदलली जात नाहीत. तसेच बदलल्यानंतर ती लगेच धुतलीही जात नाही. आता अमेरीस्लीपने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, एका आठवड्यापेक्षा जास्त काळ न धुतल्या जाणाऱ्या उशांच्या कव्हरवर, टॉयलेट सीटपेक्षा 17000 पट जास्त बॅक्टेरिया असतात.

आपण आपल्या आयुष्याचा एक तृतीयांश काळ अंथरुणावर घालवतो. अशावेळी शरीरातील घाम, कोंडा आणि मृत त्वचा उशी कव्हर्स व बेडशीटवर तसेच राहते, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. उशाच्या पृष्ठभागावरील घाम कोरडे होण्यास जास्त वेळ लागतो, ज्यामुळे सूक्ष्मजीवांचा विस्तार होतो. नंतर संक्रमण विकसित होते आणि इतरांवर त्याचा परिणाम होतो. म्हणून, आठवड्यातून एकदा तरी बेडशीट आणि उशी कव्हर्स बदलले पाहिजे आणि गरम पाण्यात धुतले पाहिजे.

मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील, सल्लागार त्वचाशास्त्रज्ञ आणि सौंदर्यप्रसाधन त्वचाशास्त्रज्ञ डॉ स्मृती नस्वा सिंग यांच्यामते, हा अभ्यास सामान्य स्वच्छता उपायांवर भर देतो, ज्याकडे आपण सामान्यतः दुर्लक्ष करतो. ही अस्वच्छता आपल्यामध्ये संसर्गाचे स्रोत ठरू शकते. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहेअसे लोक, म्हणजेच लहान मुले, वृद्ध, तसेच गंभीर आजार असलेले लोक, यांच्यासाठी हे विशेषतः महत्वाचे आहे.

अभ्यासानुसार, आपल्याच मृत त्वचेच्या पेशींपासून तयार होणारे स्टॅफिलोकोकस बॅक्टेरिया गलिच्छ बेडशीटमध्ये वाढू लागतात. या जिवाणूंमुळे कोणतीही हानी होत नाही, परंतु जर ते कोणत्याही जखमेतून किंवा छिद्रातून पुन्हा शरीरात पोहोचले तर त्यामुळे न्यूमोनियासारखे घातक आजार होऊ शकतात. तसेच यामुळे अतिसंवेदनशील व्यक्तीच्या त्वचेवर फोड, मुरुम येऊ शकतात. यासह, ऍलर्जीच्या शिंका, अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, खाज सुटणे, खोकला, नाक बंद होणे इत्यादीसारख्या समस्या उद्भवू शकतात.

एक व्यक्ती दररोज किमान 6-8 तास बेडशीट आणि उशीवर घालवते. या काळात, शरीर टाळू, तेल ग्रंथींमधून घाम आणि सामान्य स्राव निर्माण करते ज्यामुळे उशीवर ओलसरपणा येऊ शकतो. ओलसर क्षेत्र हे जीवाणू आणि बुरशीच्या वाढीसाठी प्रजनन स्थळ आहे. (हेही वाचा; India's Diabetes Epidemic: समोसे, चिप्स, पकोडे वारंवार खात असाल तर व्हा सावध; वाढतोय गंभीर मधुमेह 'महामारी'चा धोका- ICMR Report)

ही गोष्ट टाळण्यासाठी खालील उपाय करू शकता-

  • ज्यांना जास्त घाम येतो किंवा रात्री व्यायाम करतात त्यांनी अंथरुणावर पडण्यापूर्वी आंघोळ करावी.
  • झोपण्यापूर्वी मेकअप काढण्याची खात्री करावी.
  • दरवर्षी नव्या उशा आणि उशाचे कव्हर वापरा आणि दर 7 वर्षांनी गाद्या बदला.
  • पलंगावर खाणे आणि पिणे टाळा किंवा खाण्याआधी बेडवर बेस म्हणून प्लॅस्टिक शीट वापरा.
  • उशा कव्हर, बेडशीट, चादरी यांना वेळोवेळी सूर्यप्रकाश द्या.
  • उशाचे कव्हर आणि चादरी दर आठवड्याला स्वच्छ करा
  • जर एखाद्याला रात्री घाम येत असेल किंवा केसांना आणि त्वचेला तेल लावण्याची सवय असेल तर तागाचे कपडे पवारा व ते वारंवार स्वच्छ करा.

(टीप- हा लेख इंटरनेट आधारीत आहे. फक्त माहितीसाठी तो देण्यात आला आहे. लेटेस्टली मराठी याची पुष्टी करत नाही. कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)