सुषमा स्वराज ठरल्या Cardiac Arrest च्या बळी; हार्ट अटॅक पेक्षा गंभीर असलेला हा आजार नेमका आहे काय?
Late BJP leader Sushma Swaraj. (Photo Credits: Twitter)

भारतीय जनता पक्षाच्या कणखर नेत्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं 6 ऑगस्टच्या रात्री अकस्मात निधन झालं. आजारपणामुळे सक्रिय राजकारणापासून त्या लांब असल्या तरीही सोशल मीडीयाच्या माध्यमातून त्या अ‍ॅक्टीव्ह होत्या. रात्री निधनाची बातमी येण्यापूर्वी त्यांनी वकील हरीश साळवी यांच्याशी फोन वरून बातचीत केली होती. मग सगळं सुरळीत असताना असं नेमकं काय झालं ज्यामुळे सुषमा स्वराज यांनी अकाली या जगातून एक्झिट घेतली, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. एम्स रूग्णालयात दाखल केलेल्या सुषमा स्वराज यांचा बळी 'कार्डिएक अरेस्ट' (Cardiac Arrest ) ने घेतला. हृद्यविकाराच्या झटक्याने सुषमा स्वराज यांचा मृत्यू झाला असला तरीही कार्डिएक अरेस्ट हा हार्ट अटॅकपेक्षा एक वेगळा आणि गंभीर प्रकार आहे. भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आज दुपारी 3 वाजता होणार अंत्यसंस्कार

कार्डिएक अरेस्ट म्हणजे नेमकं काय?

कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही एक स्थिती असते. ज्यामध्ये मानवी शरीरात हृद्याचे पंपिंग होणं आणि रक्ताभिसरणाचे कार्य थांबते. अनेकदा हार्ट अटॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट यामधील फरक लोकांना समजत नाही परिणामी योग्य आणि वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांना जीवाला मुकावं लागतं. रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेसमुळे हृद्याला रक्तपुरवठा करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा हार्ट अटॅक येतो. तर कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये रक्तप्रवाहादरम्यान शरीरात इतर अवयवांना ऑक्सिजन पुरवण्यात बिघाड होतो.मेंदूला ऑक्सिजनच्याअभावी त्याच्या कार्यातही अडथळा निर्माण होतो परिणामी श्वासावरील नियंत्रण सुटते, शुद्ध हरपते. म्हणून हार्ट अटॅकपेक्षा कार्डिएक अरेस्ट अधिक धोकादायक असतो. हा जीवावर बेतण्याचं प्रमाणही अधिक आहे. कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही एक ‘मेडिकल इमरजन्सी’ असून त्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे असते. प्रामुखाने अशावेळेस रुग्णाला Cardio Pulmonary Resuscitation (CPR) सोबतच ठराविक इलेक्ट्रिक शॉक दिला जातो.

सुषमा स्वराज यांना मधूमेहाचा त्रास होता. 2016 साली त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. मधूमेह हा आजार सायलंट किलर म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये शरीराचे अनेक अवयव हळूहळू निकामी होतात.

सुषमा स्वराज यांना कार्डिएक अरेस्टचा झटका आल्यानंतर रात्री दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सुषमा स्वराज यांना वाचवण्यसाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण अखेर उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि 10.50 pm च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

(सूचना: वरील आर्टीकलचा उद्देश हा माहिती देणे हा आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला  घेणे आवश्यक आहे.)