भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर आज दुपारी 3 वाजता होणार अंत्यसंस्कार
Sushma Swaraj (Photo Credits: IANS)

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या निधनाने संपुर्ण देश हळहळला. 6 ऑगस्टला रात्री तीव्र हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचे दु:खद निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. आज दुपारी 3 वाजता त्यांच्यावर लोधी रोड येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती भाजपच्या कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी माहिती दिली. मंगळवारी रात्री 10 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास त्यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

सुषमा स्वराज यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आले असून त्यांचे संपुर्ण कुटूंब, नातेवाईक आणि दिग्गज मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येत आहेत. आज सकाळी 11 ते 12 च्या सुमारास त्यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

स्वराज या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यामुळेच त्यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी मंत्रिपद घेण्यासही नकार दिला होता. असं असलं तरीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या कार्यकाळात गाजवलेली कारकिर्द देशवासियांची विशेष दाद मिळवून गेली.