Layoffs and Stress Management: जगभरात सध्या जोरदार चर्चेत असलेला शब्द म्हणजे टाळेबंदी (Layoffs). ज्याला आपण कर्मचारी कपात किंवा इंग्रजीमध्ये लेऑफ (Layoffs) म्हणतात. टाळेबंदीमध्ये अनेकांच्या नोकऱ्या जातात. नोकरी गमावण्याची टांगती तलवार कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर सतत लटकत असते. अशा वेळी खरोखरच नोकरी गेली तर ते आव्हानात्मक आणि तणावपूर्ण असू शकते. अनेकांच्या बाबतीत हा अनुभव काहीसा अधिकच त्रासदायकही असू शकतो. पण, नोकरी गेली म्हणजे सर्व काही संपले असे नाही. नोकरी गेली तरी आपले नियमीत आयुष्य पुन्हा पूर्वपदावर येऊ शकते. त्यासाठी नकारात्मक विचार सोडा आणि काही आवश्यक पावले उचला. ज्यामुळे तुम्हाला ताण कमी होण्यास मदत होऊ शकेल. म्हणूनच टाळेबंदी काळात ताण-तणाव व्यवस्थापन (Stress Management During Layoffs) करण्यासाठी आवश्यक पावले टाका. पुढील टीप्स तुम्हाला ताण-तणाव टाळण्यासाठी फायद्याच्या ठरु शकतात.
मानसिक आरोग्याची काळजी घ्या: नोकरी गमावणे हे तणाव आणि चिंतेचे महत्त्वपूर्ण कारण ठरु शकते. पण असे असले तरी, या काळात आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मित्र किंवा कुटुंबाशी संपर्क साधा मनमोकळेपणाने बोला. आवश्यक असल्यास मानसोपचार तज्त्रांची मदत घ्या. (हेही वाचा, Layoffs Causes and Effects: कर्मचारी कपात किंवा टाळेबंदी म्हणजे नेमके काय? त्याची कारणे आणि परिणाम कसे असतात? घ्या जाणून )
आर्थिक परिस्थितीचे मूल्यांकन करा: तुम्ही नोकरीशिवाय किती काळ टिकून राहू शकता हे समजून घेण्यासाठी तुमच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करा. बजेट बनवा आणि शक्य असेल तिथे खर्च कमी करा. आर्थिक स्त्रोत आणि खर्च होणारी रक्कम याचा ताळेबंद लागला की नियोजन करणे सोपे जाते. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा.
बेरोजगारांसाठी योजना: बेरोजगार तरुण किंवा व्यक्तीसाठी काही सरकारी योजना आहेत का ते पाहा. त्या असतील तर त्याचा फायदा घ्या. अगदी थेट बेरोजकारांसाठी योजना नसतील तरीही इतरही काही सरकारी योजनांची मदत घेऊन आर्थिक स्त्रोत उभा करता येतो का ते पाहा.
रेझ्युमे आणि ऑनलाइन प्रोफाइल अपडेट करा: तुमचा रेझ्युमे सुधारा. तुमची कौशल्ये आणि अनुभव दाखवण्यासाठी तुमचे ऑनलाइन प्रोफाइल अपडेट करा. जसे की LinkedIn. करिअर समुपदेशक किंवा व्यावसायिक रेझ्युमे लेखकाकडून मदत घेण्याचा विचार करा.
नेटवर्क: जुने सहकारी (त्रास देणारे सोडून), नव्या कंपन्या, कार्यालये, आपले जुने वरिष्ठ, मित्र यांच्याशी संपर्क साधा. तुम्ही नवीन नोकरी शोधत आहात हे त्यांना कळू द्या. त्यांना काही संदर्भ आणि नव्याने कुठे जागा असतील तर विचारा.
नोकरीच्या संधी शोधा: नोकरीच्या संधींसाठी जॉब बोर्ड, कंपनीच्या वेबसाइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तपासा. नोकरी मेळावे आणि उद्योग कार्यक्रमांना उपस्थित राहा आणि एखाद्या रिक्रूटर किंवा स्टाफिंग एजन्सीसोबत काम करण्याचा विचार करा.
नवीन कौशल्ये शिकण्याचा विचार करा: नवीन कौशल्ये शिकण्यासाठी किंवा विद्यमान कौशल्ये शिकण्यासाठी या वेळेचा फायदा घ्या. यामध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम घेणे, कार्यशाळेत सहभागी होणे किंवा तुमच्या क्षेत्रात स्वयंसेवा करणे समाविष्ट असू शकते.
लक्षात ठेवा की नोकरी गमावणे हे तुमच्या योग्यतेचे किंवा क्षमतांचे प्रतिबिंब नाही. सकारात्मक राहा, लक्ष केंद्रित करा आणि ट्रॅकवर परत येण्यासाठी पावले उचला. टाळेबंदी काळात अनेकदा इच्छा नसतानाही कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करते. त्याचा तुमच्या क्षमता, कौशल्य यांच्याशी संबंध असतोच असे नाही. कंपन्या विशिष्ट लक्ष्य ठेवतात. त्यातून एक आकडा ठरवतात आणि तेवढ्या संख्येत कर्मचारी कमी करतात. यात काम करणारे आणि कामचुकार असा काही भेद फारसा असत नाही. त्यामुळे स्वत:ला अपराधी समजू नका.