Sharad Pawar (Photo Credits: Getty)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना काल रविवार (28 मार्च) रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले. पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 31 मार्च रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पित्ताशयात खडे झाल्याने त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तर जाणून घेऊया पित्ताशयात खडे नेमके कसे तयार होतात? त्याची लक्षणे, उपाय काय? याबद्दल सविस्तर...

पोटात वरच्या बाजूला उजवीकडे यकृत असते. त्याच्या खालच्या बाजूस पित्ताशयाची छोटी पिशवी असते. त्यात यकृतात तयार होणारा अतिरिक्त पित्तरस साठवला जातो. आहार घेतल्यावर अन्न जठरात येते. तीन तासानंतर अन्न लहान आतड्यात येते. यावेळेस पित्ताशयाच्या नलिकेमधून ठरावीक प्रमाणामध्ये पित्तरस पचनक्रियेसाठी लहान आतड्यात सोडला जातो. त्यामुळे लहान आतड्यांमध्ये आहारातून आलेल्या स्निग्ध पदार्थाचे पचन होण्यास मदत होते.

पित्ताशयात खडे होण्याचे कारण काय?

आहारात स्निग्ध पदार्थाचे प्रमाण सातत्याने अधिक असेल आणि तंतुमय पदार्थाचे (फायबर) प्रमाण कमी झाले तर पित्तरस दाट बनत जातो आणि पित्ताशयात छोटे खडे तयार होतात. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या घेणाऱ्या आणि गर्भवती स्त्रियांमध्येही याचे प्रमाण अधिक आढळून येते. अनुवंशिकता, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त वजनवाढ, पित्ताशयाच्या पिशवीतील दोष या कारणांमुळे पित्ताशयात पित्ताचे खडे होतात. पुरुषांपेक्षा महिलांना हा आजार होण्याची शक्यता सहापट अधिक असते.

लक्षणे काय?

# पोटाच्या वरच्या भागात, थोडेसे उजवीकडे दुखणे.

# जेवल्यानंतर पोटात गोळा आल्यासारखा वाटणे.

# वारंवार गॅसेस होणे.

# मळमळ होणे.

# छातीत जळजळ होणे.

पित्ताशयाच्या खडय़ामुळे त्रास होत असेल आणि कावीळ नसेल तर शस्त्रक्रिया करून हे पित्ताशय काढून टाकता येते. लॅप्रोस्कोपी (Laparoscopy) द्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते. दरम्यान, तेल-तुपाचे योग्य प्रमाणात सेवन करणे, तळलेले पदार्थ, फास्ट फूड खाणे टाळणे, नियमित व्यायाम करणे, आहारात कोशिंबीर, सलाडचा समावेश करणे, चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळं यांसारख्या फळांचे सेवन करणे, यामुळे हा आजार टाळता येऊ शकतो.