अॅस्ट्राजेनेका (AstraZeneca) आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी (Oxford University) द्वारा बनवल्या जाणार्या कोविड 19 वरील संभाव्य लसीचे काल (21 जुलै) अहवाल प्रसिद्ध करण्यात आले. पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचे निष्कर्ष समाधानकारक असल्याने आता लवकरच तिसर्या आणि अंतिम टप्प्यातील परीक्षणातील या लसीच्या प्रगतीकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. अशामध्येच आता या लसीच्या उत्पादनामध्ये सहभागी सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (Serum Institute Of India) देखील क्लिनिकल ट्रायल सुरू करणार आहे. सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पुनावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच ते यासाठी भारत सरकारकडे प्रस्ताव पाठवणार आहेत. DCGI ची मंजुरी मिळाल्यानंतर त्याच्या भारतामध्येही ट्रायल्स सुरू करता येतील.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राजेनेका यांच्या सहयोगातून तयार होणारी लस सध्या शरीरात अॅण्टीबॉडीज आणि टी सेल्स बनवण्यात यशस्वी ठरत आहे. सोबतच या लसीचा कोणताचा गंभीर परिणाम मानवी आरोग्यावर दिसून आलेला नाही. त्यामुळे आता तिसर्या टप्प्यात कोविड 19 च्या कोरोना व्हायरस विरूद्ध ही लस कसं काम करतेय हे पाहण्यासाठी तिसर्या टप्प्यात जगभर विविध वंशाच्या, लिंगाच्या, वयाच्या लोकांवर त्याची चाचणी होणार आहे.
दरम्यान ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राजेनेका यांच्या लसीच्या कामात सीरम इन्स्टिट्युट देखील सहभागी आहे. त्यांच्या AZD1222 या लसीने शरीरात रोगप्रतिकरशक्तीला चालना देण्याचं, अॅन्टी बॉडीज शरीरात टिकून ठेवण्याचं काम प्रभावी केलं आहे. लस तयार झाल्यानंतर जगभर कोट्यावधी डोस पोहचवण्यासाठी पुण्याची सीरम इंस्टिट्युट महत्त्वाची कामगिरी करणार आहे. सध्या त्यांच्याकडे व्हॅक्सिनचे लाखो डोस तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे
भारतामध्ये सध्या आयसीएम आर आणि हैदराबादची भारत बायोटेक कंपनी कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस बनवत आहे. त्यासोबतच Zydus Cadila देखील आता कोविड 19 विरूद्ध संभाव्य लसीसाठी मानवी चाचणीसाठी सज्ज आहे. त्यांच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू झाल्या आहेत.