Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) विळखा संपूर्ण जगाला बसला आहे. जगातील अनेक देशांत या विषाणूबाबत लस (Vaccine) किंवा औषध शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. या रेसमध्ये ऑक्सफोर्ड (Oxford)  युनिव्हर्सिटी पहिल्यापासूनच अग्रेसर राहिली आहे. आता ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरोना व्हायरस लसीबद्दल सकारात्मक बातमी समोर आली आहे. नुकत्याच मिळालेल्या वृत्तानुसार, ऑक्सफोर्डने तयार केलेली लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ती कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला प्रशिक्षण देते. 1,077 लोकांवर केलेल्या चाचण्यांनी हे सिद्ध केले की, या इंजेक्शनमुळे कोरोना व्हायरसशी लढा देऊ शकणाऱ्या अँटीबॉडीज आणि पांढऱ्या रक्त पेशी शरीरामध्ये निर्माण झाल्या.

ऑक्सफर्डच्या या लसीच्या पहिल्या टप्प्यातील रिझल्ट्स सोमवारी प्रकाशित झाले. युनायटेड किंगडम येथील वैद्यकीय जर्नल द लान्सेटच्या म्हणण्यानुसार, ही लस आपल्या चाचण्यांमध्ये प्रभावी ठरली आहे. जर्नलचे मुख्य संपादक रिचर्ड बोर्टन (Richard Borton) यांनी याबाबत माहिती दिली आहे. ही लस सुरक्षित असून ती रोगप्रतिकार शक्ती वाढवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे या लसीसंदर्भातील निष्कर्ष अतिशय आश्वासक आहेत, परंतु ही लस लोकांना या विषाणूपासून संरक्षण पुरविण्यासाठी पुरेसी आहे की नाही हे लवकरच कळू शकेल व त्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहेत.

एएनआय ट्वीट-

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटमध्ये (Oxford's Jenner Institute) ही लस विकसित केली गेली. ऑक्सफोर्डने एप्रिल महिन्यात कोविड-19 लसच्या पुढील विकासासाठी, मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि संभाव्य वितरणासाठी यूके येथील ग्लोबल बायोफार्मास्युटिकल कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) बरोबरचा करार जाहीर केला होता. एप्रिलमध्येच या लसीची फेज-1 चाचणी सुरू झाली होती. ऑक्सफोर्ड AZD1222 लसच्या फेज-2, फेज-3 यूके चाचणीची सुरूवात, सुमारे 10,000 प्रौढ स्वयंसेवकांद्वारे मे मध्ये जाहीर केली गेली. (हेही वाचा: Coronavirus: कोरोना व्हायरस संकटामुळे उपासमारी वाढण्याची शक्यता- गुटेरेस)

या लसीमुळे कोणतेही धोकादायक दुष्परिणाम दिसले नाहीत, मात्र चाचणी केल्या गेलेल्या 70% लोकांना ताप किंवा डोकेदुखीचा त्रास झाला. ही गोष्ट पॅरासिटामोलद्वारे कंट्रोल केली जाऊ शकते असे संशोधकांचे म्हणणे आहे.