Pulse Oximeter: जाणून घ्या घरी ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी 'पल्स ऑक्सिमीटर'चा वापर नक्की कसा करावा, तसेच त्याचे फायदे, किंमत आणि कुठे विकत घ्याल
Oximeter (Photo credits: Wikimedia Commons)

सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गामध्ये देशभरात कोट्यवधी रुग्ण आयसोलेशनमध्ये आहेत. सध्या आरोग्य सेवांच्या कमतरतेमुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत. मात्र ज्या रुग्णांना गरज आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले जाते. जेव्हा कोरोना व्हायरस संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो तेव्हा रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. जर त्याच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सहसा त्याला रुग्णालयात जाण्यास सांगितले जाते. या प्रकरणात ऑक्सिमीटर (Oximeters) महत्वाची भूमिका बजावतो. हे डिव्हाइस आपल्याला घरी ऑक्सिजनची पातळी तपासण्यात मदत करू शकते.

सध्या साथीच्या रोगामध्ये ऑक्सिमीटरचा वापर वाढला आहे, म्हणून अनेकांचा असा विश्वास आहे की एखादी व्यक्ती कोविड-19 पॉझिटिव्ह आहे की नाही, हे ऑक्सिमीटरने निश्चित केले जाऊ शकते. मात्र हे खरे नाही. ऑक्सिमीटरचा नक्की कसा उपयोग होतो हे आपण पाहणार आहोत.

ऑक्सिमीटर म्हणजे काय आणि कसे वापरावे?

पल्स ऑक्सिमीटर हे एक डिजिटल डिस्प्ले असलेले एक लहान डिव्हाइस आहे ज्यास पीपीओ म्हणजे पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर (Portable Pulse Oximeter) देखील म्हणतात. शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी रुग्णाच्या बोटावर ते कागदाच्या किंवा कपड्यांच्या क्लिपप्रमाणे लावले जाते. बोटावर लावल्यानंतर किंवा लावण्यापूर्वी ते चालू केले पाहिजे. या डिव्हाइसच्या मदतीने, रुग्णाचे पल्सेस आणि रक्त ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. त्याचे रीडिंग डिजिटल डिस्प्लेवर दर्शविले जाते. अशाप्रकारे, कोविड-19 रुग्ण ठराविक अंतराने त्यांची ऑक्सिजन पातळी तपासू शकतात.

ऑक्सिमीटर कसे काम करते?

पल्स ऑक्सिमीटर चालू केल्यावर, आतमध्ये एक प्रकाश दिसतो. आपल्या त्वचेवरील या डिव्हाइसचा प्रकाश रक्त पेशींचा रंग आणि हालचाल ओळखू शकतो. आपल्या रक्त पेशींमध्ये जिथे योग्य प्रमाणात ऑक्सिजन असते, ते ब्राईट लाल दिसतात, तर बाकीचे गडद लाल दिसतात.

ऑक्सिजन पातळी काय असावी?

सामान्यतः निरोगी व्यक्तीच्या रक्तात ऑक्सिजनची पातळी 95 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान असते. 95 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजनची पातळी फुफ्फुसांच्या काही प्रकारच्या समस्या दर्शवते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की 92 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजनची पातळी एखाद्या व्यक्तीमध्ये गंभीर आरोग्याचे प्रश्न निर्माण करू शकते आणि अशा रुग्णांना रुग्णालयात नेले पाहिजे. ऑक्सिजनची पातळी कमी असलेल्या लोकांना ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता असू शकते. हे प्रमाण रुग्णांप्रमाणे बदलू शकते म्हणून डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. (हेही वाचा: घरच्या घरी जाणून घ्या तुमच्या फुफ्फुसाची स्थिती; आरोग्य विभागाने सांगितली सोपी चाचणी)

पल्स ऑक्सिमीटर कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे की नाही हे सांगत नाही

अनेक कारणांमुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी असू शकते. कमी ऑक्सिजन पातळीचा अर्थ असा होत नाही की, चाचणी घेणार्‍या व्यक्तीला कोविड-19 चा संसर्ग झाला आहे. हे डिव्हाइस एखादी व्यक्ती कोरोना व्हायरसने संक्रमित आहे की नाही हे सांगत नाही. हे डिव्हाइस केवळ ऑक्सिजनच्या पातळीचे परीक्षण करण्यास मदत करते. मात्र, यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे आवश्यक आहे की नाही हे तपासण्यात मदत होते.

कोविड-19 साथीच्या काळात ऑक्सिमीटर का महत्त्वाचा आहे?

ऑक्सिमीटरचा उपयोग शस्त्रक्रियेनंतर रूग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो. मात्र, ज्या रुग्णांना दमा, इओसिनोफिलिया (Eosinophilia) असे श्वसनाचे आजार आहेत असे रुग्ण आपल्या घरातच ऑक्सिमीटर ठेवतात. पल्स ऑक्सिमीटरचा डेटा फक्त हेच सूचित करतो की रुग्णाला अतिरिक्त ऑक्सिजनची आवश्यकता आहे की नाही. कोरोना कालावधीत या यंत्राचे महत्त्व वाढले आहे. ऑक्सिमीटरच्या मदतीने, कोविड19 चे लवकर निदान होऊ शकते ज्यामुळे, मृत्यू दर कमी होऊ शकतो.

किंमत -

ऑक्सिमीटर ऑनलाइन आणि ऑफलाइन सहज उपलब्ध आहेत. आपल्याला तो आपल्या नजीकच्या केमिस्ट शॉपमध्येही मिळू शकतो. तसेच तो आपण विविध वैद्यकीय, नॉन-मेडिकल शॉपिंग साइटवरूनही ऑनलाईन मिळवू शकता. फीचर्सनुसार त्याची 800 ते 4000 पर्यंत किंमत असू शकते.