गरोदर महिलांसाठी लसीकरणाबाबत आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांविषयी, लसीकरणाबाबतच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड-19 कार्यकारी गटाचे अध्यक्ष डॉ एन के अरोरा यांनी डीडी न्यूजशी संवाद साधला. तर कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेत गरोदर महिलांच्या वाढत्या मृत्यूमुळे यादिशेने चर्चा सुरु झाल्याचे डॉ एन के अरोरा यांनी यावेळी सांगितले.दुसऱ्या लाटेत,कोविड-19 बाधित गरोदर महिलांच्या मृत्यूचे प्रमाण,पहिल्या लाटेच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट होते. अशा परिस्थितीत कोविड-19 लसीचा लाभ गरोदर महिलानाही मिळायला हवा असे जाणवले. गरोदर महिलांच्या बाबतीत हा दोन जीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो, एक म्हणजे ती माता आणि दुसरा जीव म्हणजे गर्भातील बाळ.म्हणूनच देशाने गरोदर महिलांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला.
या लसीमुळे या महिलांना अधिक लाभ होईल असे सांगून कोरोना विषाणूची भीती आणि चिंता यापासून त्या मुक्त राहतील असे ते म्हणाले. गरोदर महिलांच्या लसीकरणामुळे तिच्या उदरात वाढणारा गर्भही यापासून सुरक्षित ठेवता येऊ शकतो. गरोदर महिलेमध्ये प्रतिकारक्षमता विकसित झाल्यास तिच्या गर्भालाही ही सुरक्षितता प्राप्त होते. लसीचा प्रभाव आणि मातेच्या शरीरात निर्माण झालेली प्रतिकार क्षमता, बालकाच्या जन्मापर्यंत त्याच्याकडे राहते.
गरोदर महिलांसाठी लसीची सुरक्षितता
गरोदर महिलांचे लसीकरण करायला हवे कारण केवळ मातेच्या शरीरातच नव्हे तर गर्भामध्येही यामुळे प्रतिकार क्षमता निर्माण होते असा विचार संपूर्ण जगभरात आहे याकडे डॉ अरोरा यांनी, गरोदर महिलांसाठी लस कशी सुरक्षित आहे या प्रश्नाचे उत्तर देताना लक्ष वेधले. एकंदरीत आपल्या लसी सुरक्षित आहेत. युरोप आणि उत्तर अमेरिका यासारख्या पाश्चिमात्य देशात जिथे mRNA लस दिली जात आहे , गरोदर महिलांचे लसीकरण केले जात आहे. ही बाब आणि आकडेवारी लक्षात घेऊन आपल्या देशात गरोदर महिलांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पहिल्या तीन महिन्यात बाळाचे शरीर आकार घेत असल्याने या काळात गरोदर महिलांना लस देण्याबाबत काही जणांनी शंका आणि भीती व्यक्त केली होती. या शंकेचे निरसन करताना डॉ अरोरा यांनी,गरोदर महिला आणि गर्भासाठीही लस सुरक्षित असल्याचे सांगून आश्वस्त केले. आपल्या लसीमध्ये, जिवंत विषाणू नाही, जो संसर्गाला कारणीभूत ठरू शकेल,असे सांगून त्यांनी यासंदर्भातल्या भीतीचे शमन केले. अशा पद्धतीने, मातेच्या उदरातल्या गर्भावर कोणताही वाईट परिणाम होईल असे दिसत नाही असे ते म्हणाले .
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लस घेणाऱ्या गरोदर महिलेच्या प्रकृतीवर देखरेख ठेवण्यात येईल.देशात लस घेणाऱ्या गरोदर महिलांना, अस्वस्थतेच्या चिन्हाबाबत नेटवर्कच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येईल. गर्भाच्या वाढीवरही लक्ष ठेवण्यात येईल. यातून आपल्या माता , भगिनी लसीकरणा नंतर संपूर्णपणे सुरक्षित असल्याची खातरजमा होईल असे त्यांनी सांगितले .
गरोदर महिलांना लसीकरणानंतर जाणवणाऱ्या साईड इफेक्ट बाबत बोलताना डॉ अरोरा म्हणाले की 10 लाख महिलांमध्ये एका महिलेला रक्तस्त्राव किंवा गुठळी निर्माण झाल्याची समस्या अनुभवाला आली आहे. तीव्र डोकेदुखी, डोकेदुखीसह उलटी,उलटीच्या भावनेसह पोटदुखी किंवा श्वासाला त्रास अशी लक्षणे दिसू शकतात. ही तीन ते चार लक्षणे आढळून येऊ शकतात, सामान्यतः लसीकरणा नंतर तीन ते चार आठवड्याच्या कालावधीत ही लक्षणे दिसून येऊ शकतात. अशा वेळी गरोदर महिलेच्या कुटुंबीयांनी त्या महिलेला, जिथे तिचे लसीकरण झाले त्या रुग्णालयात त्वरित न्यावे, रुग्णालयात याचे कारण शोधून तिला आवश्यक ते उपचार पुरवता येतील.
गरोदर महिला लसीची मात्रा कधी घेऊ शकते ?
गरोदर महिला कधीही लस घेऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली. घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, गरोदर असल्याचे निदान झाल्यापासून कोणत्याही वेळी या महिलाना कोविड-19 लस देता येऊ शकते. पहिल्या तीन महिन्यात, दुसऱ्या किंवा तिसऱ्या तीन महिन्यात लस दिल्याने काहीही फरक पडत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.