जानेवारी 2020 पासून जगभर आणि मार्च 2020 पासून भारतामध्ये धुमाकूळ घालणारा कोरोना वायरस अजूनही कायम आहे. सध्या जगभरात कोविड 19 च्या रूग्णांची संख्या अजूनही वाढती आहे. त्याचा प्रामुख्याने धोका अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये पहायला मिळत आहे. पण यासोबतीनेच जगाला असलेली कोविड 19 वॅक्सिनची प्रतिक्षादेखील आता संपण्याच्या तयारीमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत फायझरच्या (Pfizer) कोविड 19 वरील लसीचे अंतरिम निकाल जाहीर झाले आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार ही लस 90% प्रभावी आहे. त्यामुळे जगाचं लक्ष या लसीकडे लागले आहे. अनेकांच्या मनात या लसीबद्दल अनेक प्रश्न आहेत. कोविड 19 (Covid 19) वरील लस कधी येणार? भारताला फायझरची लस मिळणार का? तुमच्या मनातील या प्रश्नांचीच काही उत्तरं या आर्टिकलमध्ये तुम्हांला मिळू शकतात.
फायझरच्या लसीबद्दल काही खास गोष्टी
- अमेरिकेच्या Pfizer आणि जर्मनीच्या BioNTech कंपनीने मिळून ही लस बनवली आहे. ही लस 90% प्रभावी असून कोविड पासून बचाव होऊ शकतो असा दावा कंपनीने अंतरिम अहवालात केला आहे. दरम्यान जुलै 2020 मध्ये या लसीच्या तिसर्या टप्प्यातील मानवी चाचणीला सुरूवात झाली असून आता त्याचे अहवाल येण्यास सुरूवात झाली आहे.
- फायझरची ही लस mRNA वॅक्सिन आहे. म्हणजेया लसीच्या प्रकारामध्ये तुमच्या शरीरात वायरस टाकला जात नाही तर त्याचा जेनेटिक कोड वापरून लस मानवी शरीरात दिली जाते. यामुळे शरिरात काही वायरल प्रोटीन तयार होतात. आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती जेव्हा खरा संसर्ग होतो तेव्हा त्याचा या प्रोटीन्सद्वारे हल्ला करून खात्मा करू शकतात.
- अमेरिकेने तिसर्या टप्प्यातील या चाचणीच्या ट्रायल्स दरम्यान 44,000 जणांवर टेस्टिंग केलं आहे. त्यामध्ये निम्म्या लोकांना प्लॅसिबो म्हणजे नुसतं पाणी आणि निम्म्यांना खरी वॅक्सिन दिली. त्यामध्ये सोमवारी जारी केलेल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार चाचणी अद्यापही सुरू असून आत्तापर्यंत यापैकी 94 जणांना कोविड झाला आहे. त्यातही 9 पेक्षा कमी जण असे आहेत ज्यांना वॅक्सिन दिली होती. या लसीच्या सुरक्षिततेचा रेट अधिक निर्दोष ठेवण्यासाठी ते 164 रूग्णसंख्येपर्यंत वाट पाहणार आहेत.
- अद्याप फायझरचा अहवाल कोणत्याही मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेला नाही. फायझर तो ट्रायल्स पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल बघून प्रकाशित करणार आहे.
- फायझरच्या लसीला सुरक्षित ठेवण्यासाठी डीप फ्रीझरची गरज आहे. त्यामुळे कमी उत्पन्न गटातील देशामध्ये ही लस पोहचवणं हे एक मोठं आव्हान असेल.
- दरम्यान निम्म्या स्वयंसेवकांचा सुरक्षिततेचा डाटा या महिन्याच्या अखेरीपर्यंत कंपनीला मिळणार असल्याने त्यानंतर अमेरिकेच्या एफडीएकडे त्याची इमरजंसी अप्रव्हुवलसाठी दिली जाईल. ती प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास डिसेंबर मध्ये अमेरिकेत लोकांना लस देण्यास सुरूवात होणार आहे.
- 2021 मध्ये फायझर अंदाजे 1.3 बिलियन लसीचे डोस बनवण्याच्या तयारीमध्ये आहे.
- भारतामध्ये फायझर वॅक्सिन उपलब्ध होणार का? असा प्रश्न देखील अनेकांच्या मनात आला आहे. पण ही mRNA वॅक्सिन असल्याने ती महागडी असेल तसेच भारतामध्ये आणणं थोडं कठीण असेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भारत सरकार आता काय करणार? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
सध्या अमेरिकेतही अजून 2-3 लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यांमध्ये आहेत. त्यांचे अहवाल देखील स्पष्ट होतील. भारतामध्ये ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनेका यांची लस सीरम इंस्टिट्युट कडून 'कोविशिल्ड' लस अंतिम टप्प्यात आहे. सोबतच आयसीएमआर आणि भारत बायोटेकची देखील लस आहे.