Vaccine | Image used for representational purpose (Photo Credits: Oxford Twitter)

Corona Vaccine: कोरोना संक्रमणामुळे ग्रस्त असलेल्या देशासाठी एक दिलासादायक बातमी आहे. औषधोपचार कंपनी फायझर (Pfizer) ने तयार केलेली कोरोना व्हॅक्सीन (Corona Vaccine) 90 टक्के परिणामकारक असल्याचं तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीत समोर आलं आहे. या बातमीमुळे जगातील अनेक देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या महिन्याच्या अखेरीस सर्व काही ठीक असल्यास कंपनीला लस विकायला मान्यता मिळू शकणार आहे. जागतिक महामारी रोखण्यासाठी ही नक्कीच खूप आशादायी बातमी आहे. फायझर आणि बायोटेक एकत्रितरित्या कोरोना लस विकसित करीत आहे. यातील फायझर ही अमेरिकन तर बायोटेक ही जर्मन औषध कंपनी आहे.

फायझर कंपनीने सोमवारी सांगितले आहे की, या चाचणी 90 टक्के रुग्णांवर सकारात्मक परिणाम झाल्याचं समोर आलं. या संक्रमित रुग्णांमध्ये कोविडचे किमान एक लक्षणं होते. ही लस अद्याप चाचणीच्या टप्प्यात आहे. परंतु, लवकरचं त्याचा वापर करण्याचा मार्ग जगभरात मोकळा होईल. कोरोना साथीने आतापर्यंत जगभरात 1.2 दशलक्षाहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे सर्वचं देशाचे कोरोना लसीकडे लक्ष लागले आहे. (हेही वाचा - COVID-19 Vaccine: युएईचे पंतप्रधान Sheikh Mohammed Bin Rashid Al Maktoum यांना देण्यात आली कोरोना विषाणू लस)

दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील आपल्या ट्विट अकाऊंटवरून यासंदर्भात माहिती दिली आहे. यात त्यांनी कोरोनावरील लस लवकरचं येणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच ही लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितलं आहे.

बायोएनटेक कंपनीचे सह-संस्थापक उगुर साहिन यांनी सांगितलं की, आजचा दिवस खूप मोठा आहे. विज्ञान आणि मानवतेसाठी आजचा दिवस महान आहे. तसेच फायझर कंपनीचे अध्यक्ष अल्बर्ट बोरला यांनी म्हटलं आहे की, कोरोना लसीसंदर्भात कंपनीला मोठं यश आलं आहे. कंपनी या महिन्याच्या अखेरीस हेल्थ रेग्युलेटरकडे लस विक्रीच्या परवानगीसाठी अर्ज करणार आहे.