UAE PM Sheikh Mohammed Bin Rashid Al Maktoum taking COVID-19 Vaccine Shot. (Photo Credits: ANI)

संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम (Sheikh Mohammed Bin Rashid Al Maktoum) यांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लस देण्यात आली. स्वतः शेख मोहम्मद यांनी ट्विटरवर कोरोना लसीकरण केल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक आरोग्य कर्मचारी शेख मोहम्मद यांच्या उजव्या हातात कोरोनाची लस लावत असलेला दिसून येत आहे. शेख मोहम्मद यांनी ट्वीट करून लिहिले आहे की, ‘आज मी कोरोनाची लस घेतली. सर्वांना सुरक्षा आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा. आमचे आरोग्य कर्मचारी, ज्यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये लस देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत त्यांचा आम्हाला अभिमान आहे.’ यासह ते म्हणाले युएईचे भविष्य नेहमीच चांगले राहील.

गेल्या काही आठवड्यांत युएईच्या अनेक मंत्र्यांनाही कोरोनाची लस देण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीने कोरोना व्हायरस रूग्णांच्या संपर्कात असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, देशाच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून या लसीचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे नियम व कायद्यांचे पूर्णपणे पालन करीत या निर्णय घेतला आहे. यासह युएईमध्ये कोरोना लस परवान्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. (हेही वाचा: मॉडर्ना कंपनीच्या कोविड-19 लसीचे सकारात्मक परिणाम; प्रायोगिक तत्त्वावर लस लॉन्च करण्यासाठी सज्ज)

दरम्यान, भारताने कोरोना विषाणूच्या लसचे 60 कोटी डोस प्री-ऑर्डर केले आहेत. या व्यतिरिक्त एक अब्ज डोस मिळविण्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. अमेरिकेने81 कोटी डोस प्री-ऑर्डर केले आहेत. दरम्यान, भारत बायोटेक पुढील वर्षी दुसर्‍या तिमाहीत कोविड-19 ची कोरोना लस बाजारात आणण्याच्या विचारात आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारताच्या नियामक अधिकाऱ्यांकडून आवश्यक मान्यता मिळाल्यास कंपनीची ही योजना आहे. जगभरात कोरोना संसर्गाची प्रकरणे 46 कोटी 68 लाखांपेक्षा जास्त झाली आहेत, तर मृतांचा आकडा 12 लाख 5 हजारांवर पोहोचला आहे.