COVID-19 Vaccine Update: मॉडर्ना कंपनीच्या कोविड-19 लसीचे सकारात्मक परिणाम; प्रायोगिक तत्त्वावर लस लॉन्च करण्यासाठी सज्ज
Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीने (Moderna Company) प्रायोगिक तत्त्वावर कोरोना व्हायरस वरील लस (Experimental Coronavirus Vaccine) लॉन्च करण्याची तयारी दर्शवली आहे. मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल (Moderna CEO Stephane Bancel) यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले की, "mRNA-1273 लसीच्या लॉन्चसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जगभरातील देशांच्या सरकारसोबत या लसीच्या पुरवठा करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, लसीच्या डोस पुरवण्यासाठी ग्राहकांनी केलेल्या ठेवीतून कंपनीमध्ये तिसऱ्या तिमाहित तब्बल 1.1 बिलियन डॉलर जमा झाले आहेत. अशी माहिती कंपनीने फायलिंगमध्ये नमूद केली आहे."

mRNA-1273 लसीच्या विकासादरम्यान मॉर्डना कंपनी वैज्ञानिक संशोधन आणि उच्च डेटा गुणवत्ता यासाठी वचनबद्ध असल्याचेही कंपनीच्या सीईओंनी सांगितले आहे. (कोविड 19 लसींबाबत गूडन्यूज! Johnson & Johnson ची लस जानेवारी 2021 पर्यंत येण्याची शक्यता तर Oxford-AstraZeneca vaccine वयोवृद्धांमध्येही सकारात्मक परिणाम देत असल्याची माहिती)

मॉडर्नाच्या कोविड-19 लसीमध्ये RNA किंवा mRNA असल्याने विषाणू विरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असा संशोधकांचा विश्वास आहे. mRNA-1273 ही लस मॉडर्ना कंपनी आणि अमेरिका सरकारची राष्ट्रीय आरोग्य संस्था ही एकत्रिपणे विकसित करत आहेत.

मॉर्डना कंपनीची कोविड-19 वरील लस सर्व वयोगटातील लोकांना दिली जावू शकते. तसंच या लसीचे परिणाम जलद आणि तीव्र असल्याचे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या अभ्यासातून समोर आले आहे. तर पहिल्या टप्प्यातील चाचणीत वृद्धांवरही या लसीचे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय सकारात्मक परिणाम दिसून आले, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

सध्या या लसीच्या मोठ्या प्रमाणावर मानवी चाचण्या सुरु आहेत. अलिकडेच मॉडर्ना कंपनीने लसीच्या चाचण्यांसाठी 30,000 स्वयंसेवकांचा टप्पा पार केला आहे. येत्या आठवड्यात या लसीच्या चाचण्यांचे परिणाम समोर येतील.

यापूर्वी मॉडर्ना कंपनीने रायटर्सला दिलेल्या माहितीनुसार, mRNA-1273 ही लस कोविड-19 वर 70% प्रभावी ठरली तर अधिक धोका असलेल्या रुग्णांनी ही लस देण्यासाठी FDA कडून इमर्जन्सी परवानगी मागण्यात येईल.

11 ऑगस्ट रोजी लस पुरवठ्यासंबंधित मॉडर्ना कंपनीचा अमेरिका सरकार सोबत करार झाल्याची घोषणा केली. या कराराअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर  लॉन्च करण्यात येणाऱ्या लसीचे प्रारंभिक 100 मिलियन डोसस पुरवण्यात येणार आहेत. दरम्यान, लसीची किंमत ठरवण्यासंदर्भात कंपनीची COVAX सोबत चर्चा सुरु आहे.