HMPV Outbreak In China: चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (Human Metapneumovirus) पसरत असल्याच्या वृत्तामुळे भारत सरकारही सतर्क झाले आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) ने श्वसन आणि हंगामी इन्फ्लूएंझाच्या प्रकरणांचा मागोवा घेणे सुरू केले आहे. विभाग आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या संपर्कात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवू. माहिती तपासून त्यावर आधारित अपडेट करण्यात येईल.
घाबरण्याची गरज नाही - आरोग्य सेवा महासंचालनालय
आरोग्य सेवा महासंचालनालयाचे (डीजीएचएस) अधिकारी डॉ. अतुल गोयल म्हणाले की, चीनमध्ये एचएमपीव्हीच्या प्रसाराबद्दल घाबरण्याची गरज नाही. त्यांनी सर्व श्वसन संक्रमणांच्या बाबतीत खबरदारी घेण्याचे सुचवले आहे. सध्याच्या परिस्थितीबद्दल काळजी करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. (हेही वाचा -Human Metapneumovirus: कोरोना व्हायरसनंतर आता चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस चा प्रकोप; अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर)
देखरेख आणि प्रतिबंध आवश्यक -
डॉ.डांग्स लॅबचे सीईओ डॉ.अर्जुन डांग यांनी सांगितले की, चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) चा प्रादुर्भाव झाल्यानंतर या विषाणूचा प्रसार रोखण्याची आणि निगराणी वाढवण्याची नितांत गरज आहे. हा विषाणू जास्त घनतेच्या लोकसंख्येमध्ये अधिक प्राणघातक असू शकतो. (हेही वाचा: 'Disease X': कोरोनानंतर नव्या गूढ महामारीचे संकेत; जाणून घ्या काय आहे 'एक्स' आजार, त्याची लक्षणे व कशी घ्याल काळजी)
HMPV ची लक्षणे -
डॉ.डांग यांच्या मते एचएमपीव्हीची लक्षणे इतर श्वसनाच्या विषाणूंसारखीच असतात. त्याचा प्रसार तातडीने आटोक्यात आणला नाही तर त्याचा आरोग्य सेवेवर अधिक ताण येऊ शकतो. डॉ. अर्जुन डांग यांच्या मते, या विषाणूच्या लक्षणांमध्ये ताप, खोकला, नाक बंद होणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि अस्वस्थता यांचा समावेश होतो. गंभीर प्रकरणांमध्ये, ब्रॉन्कायलाइटिस किंवा न्यूमोनिया देखील होऊ शकतो. तथापि, हा धोका लहान मुले आणि वृद्धांमध्ये जास्त असतो.
एचएमपीव्हीसाठी विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नाही -
डॉ.अर्जुन डांग यांनी सांगितले की, एचएमपीव्हीसाठी विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नाही. प्रतिबंध हा त्याचा प्राथमिक उपचार आहे. सध्या या विषाणूची पॉलिमरेझ चेन रिॲक्शन (पीसीआर) चाचणी हे निदानाचे मानक आहे. ताप नियंत्रित करून आणि ऑक्सिजन थेरपी वापरून गंभीर प्रकरणांवर उपचार केले जातात.
एचएमपीव्हीपासून वाचण्यासाठी उपाय -
काही चांगल्या सवयी लावून व्हायरसचा धोका कमी करता येतो. वारंवार हात धुणे, खोकताना आणि शिंकताना तोंड झाकणे आणि बाधित व्यक्तीपासून अंतर राखणे यामुळे हा धोका बऱ्याच अंशी टाळता येऊ शकतो असे डॉ. अर्जुन डांग यांनी म्हटलं आहे.