Virus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या 5 वर्षांनंतर चीनमध्ये (China) पुन्हा एकदा मृत्यूची लाट उसळली आहे. कोरोनाने केवळ चीनमध्येच नाही तर संपूर्ण जगातील लोकांमध्ये भीती निर्माण केली होती. या व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला होता. या महामारीला 5 वर्षे उलटून गेली आहेत. आता पुन्हा एकदा चीनला अजून एका रहस्यमय विषाणूचा तडाखा बसला आहे. सोशल मीडियावरील दाव्यांनुसार, चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) संसर्ग वाढत आहे, ज्यामुळे मोठ्या आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत.

या व्हायरसमुळे चीनमध्ये आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आल्याचा दावाही एका यूजरने केला आहे. मात्र, या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत. चिनी आरोग्य अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी महामारी किंवा आपत्कालीन स्थितीबाबत कोणतेही विधान केलेले नाही.

2001 मध्ये पहिल्यांदा आढळला होता-

फायनान्शिअल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हा विषाणू 2001 मध्ये सापडला होता. हा विषाणू वाढत्या थंडीने लोकांना संक्रमित करतो. राष्ट्रीय रोग नियंत्रण आणि प्रतिबंध प्रशासनाने या विषाणूबाबत प्रयोगशाळेत अहवाल देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की 16 ते 22 डिसेंबर दरम्यान संसर्ग झपाट्याने वाढला. आता चीन पुन्हा जगाला नवीन महामारी देणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Human Metapneumovirus-

कोविड-19 महामारीच्या काळात रुग्णालयांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती आणि आता पुन्हा एकदा चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोरोना व्हायरसनंतर चीनमध्ये पुन्हा एकदा मृत्यूची दहशत माजली आहे. हा विषाणू प्रामुख्याने 14 वर्षाखालील मुले आणि वृद्धांना प्रभावित करतो. तसेच तो प्रामुख्याने हिवाळ्याच्या हंगामात पसरतो आणि खोकला, ताप आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी लक्षणे निर्माण करतो. (हेही वाचा: 'Disease X': कोरोनानंतर नव्या गूढ महामारीचे संकेत; जाणून घ्या काय आहे 'एक्स' आजार, त्याची लक्षणे व कशी घ्याल काळजी)

दरम्यान, चीनच्या नॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने लॅब रिपोर्टिंग प्रक्रियेला गती दिली आहे आणि संक्रमित रूग्णांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे जगभरात चिंता वाढली आहे. हे संकट थांबवण्यासाठी लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सर्वांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक आरोग्य सूचनांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.