Mumbai's Sleep Crisis: मुंबईकरांची झोप उडाली; जवळजवळ 61 टक्के लोकांना कामावर असताना झोप येते, 31 टक्के लोकांना रात्री सतावते भविष्याची चिंता- Survey
झोप (फोटो सौजन्य - फेसबुक)

एका नवीन सर्वेक्षणातून दिसून आले आहे की, 61% मुंबईकरांना (Mumbai) कामावर असताना मोठ्या प्रमाणावर झोप (Sleepy) येते, तर अंदाजे 35% लोकांच्या मते त्यांना कामाच्या वेळी भयंकर निद्रानाश होतो. स्लीप सोल्यूशन्स फर्म Wakefit.co ने The Great Indian Sleep Scorecard (GISS) विकसित केले आहे, ज्याचा उद्देश भारतीयांच्या झोपेचे नमुने आणि ट्रेंड ओळखणे आहे. यांच्याद्वारे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. मुंबई हे ‘कधीही न झोपणारे शहर’ म्हणून ओळखले जाते व इथले 70% लोक रात्री 11 नंतर झोपतात असे सर्वेक्षणात आढळून आले आहे.

मुंबईकर हे जवळजवळ मध्यरात्री झोपतात व त्यातील 29 टक्के लोकसंख्या सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान उठते. जवळजवळ 49 टक्के लोकांना उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही. विशेष म्हणजे GISS- 2022 मध्ये असे आढळून आले होते की, 53 टक्के मुंबईकरांना कामावर झोप येते जी आता 61 टक्के (2023) पर्यंत वाढली आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण 67 टक्के तर पुरुषांचे प्रमाण 56 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवणाऱ्या लोकंसंख्येमध्ये यंदा 34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. साधारण 43 टक्के मुंबईकरांना असे वाटले की, त्यांच्या बेडरूमच्या वातावरणाचा त्यांच्या झोपेवर परिणाम होत आहे. मुंबईचे मेडिको, डॉ हिमांशू शाह म्हणाले की, ‘इतर आजार असलेल्या अनेक रुग्णांमध्ये झोपेची समस्या ही एक मोठी तक्रार आहे. मुख्यतः यामागे स्वतःच्या आणि कुटुंबासाठी भविष्याची भीती आणि तणाव ही कारणे समोर आली आहेत. साधारण 31 टक्के मुंबईकरांना कुटुंबाच्या भविष्याच्या चिंतेमुळे लवकर झोप येत नाही.

प्रख्यात नेचर थेरपिस्ट आणि अॅक्युपंक्चर तज्ज्ञ डॉ मायी (शुभांगी) देशमुख यांच्यामते, विशेषतः साथीच्या आजारानंतरच्या काळात झोपेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. डिजिटल स्क्रोलिंग हे देखील लवकर झोप न येण्याचे कारण मानले जात आहे. मुंबईकरांपैकी तब्बल 37 टक्के लोक रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियावर ब्राउझिंग करत राहतात, तर 88 टक्के लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी त्यांचा फोन वापरल्याचे कबूल केले आहे आणि 90 टक्के लोक रात्री किमान एकदा-दोनदा झोपेतून जागे झाले आहेत. (हेही वाचा: काळजी घ्या! 2035 पर्यंत जगातील निम्मी लोकसंख्या असेल 'या' आजाराने ग्रस्त; समोर आला धक्कादायक अहवाल)

डॉ शाह म्हणतात की, अपुरी झोप किंवा चांगली झोप न लागणे, याचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. यासह वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन, तसेच त्याच्या उत्पादकतेवर आणि अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय उत्पादकतेवरही त्याचा परिणाम होतो. दरम्यान, Wakefit.co ने सांगितले की, GISS-2023 साठी, मार्च 2022-फेब्रुवारी 2023 पर्यंत 10,000 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले.