Representative image

दरवर्षी 4 मार्च रोजी ‘लठ्ठपणा दिवस’ (World Obesity Day) साजरा केला जातो. लोकांमध्ये वाढत्या लठ्ठपणाच्या आजाराबाबत जागरूकता पसरवण्यासाठी हा एक आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे. अशा स्थितीत जागतिक स्थूलता दिनानिमित्त प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनचा नवा अहवाल समोर आला असून, त्यानुसार 2035 पर्यंत जगातील निम्मी लोकसंख्या लठ्ठपणाचा शिकार होईल. वर्ल्ड ओबेसिटी ऍटलसच्या अहवालात म्हटले आहे की, 2035 पर्यंत जगातील सुमारे 51% लोक त्यांच्या वयाच्या तुलनेत जास्त वजनाचे असू शकतात.

तसेच, या अहवालात विशेषत: लहान मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये वाढत्या लठ्ठपणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून, भविष्यात असे लोक मधुमेह आणि हृदयविकाराचे बळी ठरू शकतात. या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, 2025 पर्यंत तरुण पिढीवर लठ्ठपणाचा मोठा परिणाम दिसून येईल, जो 2035 पर्यंत भयावह असेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, लठ्ठपणा 'महामारी पातळी' वर पोहोचला आहे.

अशा परिस्थितीत जगभरातील सरकारे आणि धोरणकर्त्यांनी तरुण पिढीच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. लठ्ठपणा हा एक वैद्यकीय शब्द आहे ज्याचा वापर शरीरात जास्त चरबी असलेल्या व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी केला जातो. बॉडी मास इंडेक्सच्या मदतीने त्याचे मूल्यांकन केले जाते. लठ्ठपणाशी संबंधित आजार आणि त्याच्या घातक परिणामांमुळे संपूर्ण जगात दरवर्षी 50 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो.

लठ्ठपणा हा एक जटिल आजार आहे जो कोणत्याही वयात होऊ शकतो. हा रोग प्रौढ आणि मुलांना समान रीतीने प्रभावित करतो. 2016 पर्यंत, जगभरात 1.9 अब्ज लोकांचे वजन जास्त होते. हे एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 39 टक्के आहे. त्याच वेळी, 650 दशलक्ष लोक, म्हणजे 13 टक्के लोक लठ्ठपणासह जगत होते. डब्ल्यूएचओच्या ग्लोबल हेल्थ ऑब्झर्व्हेटरीनुसार, 1980 पासून लठ्ठ प्रौढांची संख्या तिप्पट झाली आहे. साधारण 5 ते 19 वर्षे वयोगटातील 34 कोटींहून अधिक मुले लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. (हेही वाचा: How To Beat The Heat: उष्माघाताचा धोका टाळा! 'ही' लक्षणे दिसल्यास घ्या वैद्यकीय सल्ला)

दरम्यान, लठ्ठपणामुळे टाइप 2 मधुमेह होऊ शकतो, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर वाढू शकते. हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होऊ शकतो. एंडोमेट्रियल, एसोफेजियल, यकृत, मूत्रपिंड आणि गुदाशय यांच्याशी संबंधित कर्करोग देखील होऊ शकतात. लठ्ठपणा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकतो.