मुंबई: LifeLine Express Hospital Train सीएसएमटी फलाट दहावर दाखल; रुग्णांवर कर्करोग, ईएनटी, प्लॅस्टिक सर्जरी उपचार उपलब्ध
LifeLine Express Hospital Train In Mumbai | (Photo Credits: ANI)

LifeLine Express In Mumbai: गेली 28 वर्षे भारताची एकमात्र मेडीकल ट्रेन म्हणून ओळखली जाणारी लाइफ लाइन एक्सप्रेस ट्रेन (LifeLine Express Hospital Train) मुंबई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) फलाट क्रमांक दहावर दाखल झाली आहे. ही ट्रेन सीएसएमटी (CSMT) येथे गुरुवारी (29 ऑगस्ट 2019) दाखल झाली. ही ट्रेन भारतातील अशा ठिकाणी जाते, जी ठिकाणं अधिक दूर्गम आहेत. जिथे नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयं, डॉक्टर्स, आधुनिक साधने उपलब्ध नाहीत. प्राप्त माहितीनुसार या ट्रेनच्या माध्यमातून आतापर्यंत 12.32 लाख लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेने ही ट्रेन 1991 मध्ये तयार केली. या ट्रेनला लाइफलाइन एक्सप्रेस असे नाव देण्यात आले. या ट्रेनला 7 डबे आहेत. रल्वे रुळांवरुन धावणारे रुग्णालय म्हणूनही या ट्रेनला ओळखले जाते. लाइफलाइन एक्सप्रेसमध्ये दोन डबे कर्करोग (Cancer) पीडित व्यक्तींच्या उपचारांसाठी आहेत. यात महिलांसाठी स्तनाचा कर्करोग (Breast Cancer)  निदान आणि ईएनटी, प्लॅस्टिक सर्जरी उपचार करण्यासाठी आवश्यक मेमोग्राफी मशीन बसविण्यात आली आहे.

देशभरातील मागास, दूर्गम परिसरात लाइफ लाइन एक्सप्रेस ट्रेन दाखल होते. त्यासाठी रुग्ण संख्येचा एक आराखडा तयार केला जातो. लाइफ लाइन एक्सप्रेस ट्रेन व्यवस्थापनाकडे आलेल्या मागणीनुसार ही ट्रेन संबंध वर्षभरात कोणकोणत्या ठिकाणी जाणार याबाबत एक वेळापत्रक तयार केले जाते. व्यवस्थापनाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार ही ट्रेन ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी देशभरातील विविध रेल्वे स्टेशनवर क्रमाक्रमाने हजेरी लावते.

लाइफ लाइन एक्सप्रेस ट्रेन ज्या परिसरात जाणार असते त्या ठिकाणी त्या त्या परिसरातील सर्वात मोठ्या रुग्णालयांतील डॉक्टर आगोदरच उपस्थित असतात. तसेच, रुग्णांना दिलेल्या तारखेनुसार त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. ही ट्रेन ठरलेल्या स्टेशनवर एक आठवडा (7 दिवस) थांबते. इथे रुग्णांवरती केले जाणारे उपचार मोफत असतात. त्यासाठी मोठमोट्या कंपन्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (CSR) फंडातून आर्थिक मदत देत असतात. हे काम इम्पैक्ट इंडिया फाउंडेशन द्वारा चालवले जाते. (हेही वाचा, Fit India Movement: मिशन फिट इंडिया कार्यक्रमास सुरुवात, जाणून घ्या 5 महत्त्वाचे मुद्दे)

एएनआय ट्विट

दरम्यान, ही ट्रेन जेव्हा सुरु झाली तेव्हा तिचे स्वरुप अगदीच प्राथमिक होते. यात वापरुन जुनाट झालेले डबे या ट्रेनला जोडण्यात आले होते. त्यालाच चालत्या फिरत्या रुग्णालयात परावर्तित करण्यात आले होते. त्यातून आदिवासी परिसारातील नागरिकांवर उपचार करण्यास प्राधान्य दिले गेले. कारण, त्यांच्यापर्यंत आरोग्य सेवाच पोहोचल्या नव्हत्या. ज्या उपलब्ध होत्या त्या घेण्यासाठी अदिवासींकडे पैसेच नव्हते. दरम्यान, काळासोबत बदल करत या ट्रेन चेहरामोहरा बदलण्यात आला. या ट्रेनच्या डब्यांना आधुनिकीकरणाची जोड देत सुसज्ज बनविण्यात आले. आज या ट्रेनला 7 डबे असले तरी, त्यात विविध आणि अत्यावश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ज्यात ईएनटी, प्लॅस्टिक सर्जरी आणि कर्करोग, स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) आदी आजारांवर उपचार करणे शक्य आहे