वेकफिट.को (Wakefit.co) या होम सोल्यूशन्स प्रदात्याने नुकतेच त्यांच्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड (जीआयएसएस) 2024 चा ७वा अहवाल सादर केला आहे. यंदाच्या सर्वेक्षणामधून मुंबईतील झोपेचे ट्रेण्ड्स व पद्धतींबाबत नवीन माहिती निदर्शनास आली. या अहवालामधील निष्कर्षानुसार, जवळपास पन्नास टक्के मुंबईकर रात्री 11 नंतर झोपतात. तसेच मुंबईतील 55 टक्के व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर रिफ्रेश वाटत नाही. ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या 49 टक्क्यांच्या तुलनेत वाढ झाली आहे. (हेही वाचा - Sleep Deprivation: कोविडनंतर निद्रानाशाच्या समस्येमध्ये वाढ; 61% भारतीय लोक 6 तासांपेक्षा कमी शांत झोप घेतात- Survey)
मुंबईतील 46 टक्के व्यक्ती रात्री 11 नंतर झोपतात, ज्यामधून रात्री उशिरापर्यंत केल्या जाणाऱ्या अॅक्टिव्हीटी प्रचलित ट्रेण्ड दिसून येत असल्याचे अहवालामधून निदर्शनास आले आहे. मुंबईतील रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याच्या प्रमाणामधून 55 टक्के व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर रिफ्रेश न वाटण्याचे दिसून येते. या अहवालामधून निदर्शनास आले की, 89 टक्के मुंबईकर रात्रीच्या वेळी 1 ते 2 वेळा उठतात. झोपेचा दर्जा खालावत जाण्याच्या लक्षणांमूधन 32 टक्के मुंबईकरांनी झोपेचा आजार झाल्याचे सांगितले आहे.
झोपण्याच्या किमान एक तास अगोदर डिजिटल डिवाईसेस न पाहणे हे उत्तम झोपेसाठी आवश्यक आहे. तरीदेखील 90 टक्के मुंबईकर झोपण्यापूर्वी फोनचा नियमितपणे वापर करतात. या अहवालामधून निदर्शनास आले की 52 टक्के मुंबईकर रात्री उशिरापर्यंत जागे राहण्यासाठी ओटीटी व सोशल मीडिया हे प्रमुख कारण आहेत. या अहवालामधून निदर्शनास आले की, मुंबईतील जवळपास 30 टक्के कर्मचारी कामानिमित्त रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. तसेच, 57 टक्के मुंबईकरांना कामकाजाच्या वेळी थकल्यासारखे व झोप आल्यासारखे वाटते. यामधून झोपमोडचा त्यांच्या उत्पादकतेवर आणि आरोग्यावर होणारा परिणाम दिसून येतो.