Sleep Deprivation: आजकालच्या या धावपळीच्या जीवनात लोकांना शांतपणे श्वास घ्यायलाही वेळ नाही. अशा स्थितीत त्यांना पुरेशी झोप (Sleep) मिळत नाही व यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अलीकडेच, आरोग्य तज्ञांनी भारतातील लोकांमध्ये निद्रानाशाच्या वाढत्या समस्येवर चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, निद्रानाशाच्या वाढत्या समस्येमुळे हृदय आणि मेंदूशी संबंधित अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये दिसून येत आहेत. लोकल सर्कलने केलेल्या सर्वेक्षणात भारतीयांच्या झोपेच्या स्थितीबाबत अनेक धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत. सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, 61% भारतीय लोक 6 तासांपेक्षा कमी शांत झोप घेतात.
प्रत्येक व्यक्तीसाठी सात तासांची झोप आवश्यक आहे. सात तास झोप न घेतल्यास त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होतो. याचा तुमच्यावर शारीरिक आणि मानसिक परिणाम होऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, भारत आणि जागतिक समुदायामध्ये निद्रानाशाची समस्या झपाट्याने वाढत आहे.
गेल्या दोन वर्षांत भारतीयांमध्ये निद्रानाशाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये हे प्रमाण 50 टक्के होते, ते 2023 मध्ये 55 टक्के झाले आणि आता म्हणजे 2024 मध्ये हा आकडा 61% वर पोहोचला आहे. सर्वेक्षण केलेल्या 38% लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांना फक्त 4 ते 6 तासांची अखंड झोप मिळते. तर 23% लोकांचे म्हणणे आहे की, गेल्या एका वर्षात त्यांना दिवसातून सरासरी फक्त 4 तासांचीच झोप मिळत आहे. त्याच वेळी अवघ्या 11% भारतीयांनी गेल्या एका वर्षात 8 तासांपेक्षा जास्त झोप घेतली आहे. जवळजवळ 26% भारतीयांचे म्हणणे आहे की कोविड-19 नंतर त्यांची झोपेची स्थिती बिघडली आहे.
भारतातील 309 जिल्ह्यांमधून केलेल्या या सर्वेक्षणात एकूण 41,000 प्रतिसाद आले आहेत. त्यापैकी 66% पुरुष आणि 34% महिला आहेत. दरम्यान, पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. सतीश निर्हाळे म्हणाले, ‘झोपेच्या कमतरतेमुळे अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्मरणशक्ती, एकाग्रता, सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.’ डॉ. लान्सलॉट पिंटो म्हणतात, ‘खराब झोप आणि डिजिटल उपकरणांचा जास्त वापर यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही परिणाम होऊ शकतात.’