आजकाल जवळजवळ प्रत्येकाकडे स्मार्टफोन (Smartphone) आहेत. विविध कामांसाठी अशा फोन्सचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र फोनचा अति वापर ही धोक्याची घंटा ठरू शकते. मोबाईल फोनच्या अति वापरामुळे पुरुषांमध्ये नपुंसकत्वाचा (Sperm Count) धोका वाढू शकतो, असे एका नवीन अभ्यासात म्हटले आहे. पुरुषांचे फोन त्यांच्या वंध्यत्वाचा धोका वाढवण्यासाठी जबाबदार असू शकतात, असा दावा फर्टिलिटी अँड स्टेरिलिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात करण्यात आला आहे.
या अभ्यासानुसार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करणाऱ्या मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होते आणि शुक्राणूंच्या कमतरतेमुळे पुरुषांची पिता बनण्याची क्षमता कमी होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, गेल्या 50 वर्षांत पुरुषांच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेत मोठी घसरण झाली आहे. याची अनेक कारणे आहेत जी पर्यावरण आणि लोकांच्या जीवनशैलीशी संबंधित आहेत. मात्र मोबाइल फोनच्या प्रभावाचा अद्याप विचार केला गेला नव्हता. आता स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी 18 ते 22 वयोगटातील 2,886 स्विस पुरुषांच्या डेटाचे विश्लेषण केले जे सुमारे 13 वर्षांच्या कालावधीत (2005 आणि 2018) उपचारासाठी आले होते. या डेटावर आधारित क्रॉस-सेक्शनल अभ्यासामध्ये मोबाईल फोनचा अतिवापर आणि शुक्राणूंची कमी संख्या व कमकुवत शुक्राणूंची गतिशीलता यासारख्या समस्यांमधील संबंध आढळून आला. (हेही वाचा: Viagra Overdose: व्हायग्रा गोळ्यांचा डबल डोस जीवावर बेतला, तरुणाचा Heart Attack ने मैत्रिणीसमोरच मृत्यू)
अभ्यासात असे दिसून आले आहे की, ज्या पुरुषांनी मोबाईल फोन कमी वापरला त्यांच्या शुक्राणूंची गुणवत्ता फोनचा जास्त वापर करणाऱ्या पुरुषांपेक्षा चांगली होती. शुक्राणूंची गुणवत्ता शुक्राणूंची संख्या, शुक्राणूंची गतिशीलता आणि त्यांची रचना यासारख्या पॅरामीटर्सच्या मूल्यांकनाच्या आधारे निर्धारित केली जाते. अभ्यासामध्ये दिसून आले की, ज्या 18 ते 22 वयोगटातील पुरुषांनी दिवसातून 20 पेक्षा जास्त वेळा त्यांचा फोन वापरला त्यांच्यामध्ये एकूण शुक्राणूंची संख्या कमी होण्याचा धोका 21% जास्त आहे. काही इतर अभ्यासांमध्ये देखील असे दिसून आले आहे की, गेल्या 5 दशकांमध्ये पुरुषांमधील शुक्राणूंच्या गुणवत्तेत झपाट्याने घट झाली आहे.