अजूनही जग कोरोना विषाणू महामारीतून पूर्णपणे सावरलेले नाही त्यात आता आणखी एका विषाणूने दार ठोठावले आहे. पश्चिम आफ्रिकेतील घाना (Ghana) येथे 2 लोकांना मारबर्ग विषाणूची (Marburg Virus) लागण झाल्याचे आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घानामधील 2 लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यांना या प्राणघातक संसर्गाची पुष्टी झाली आहे. घानाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पुष्टी झालेल्या दोन लोकांमध्ये अतिसार, उलट्या, ताप आणि अस्वस्थता ही लक्षणे दिसून आली होती.
घानामध्ये मारबर्ग विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना सतर्क झाली आहे. मारबर्ग विषाणूबद्दल विषाणूशास्त्र तज्ञ म्हणतात की, तो इबोला विषाणूपेक्षा वेगाने पसरतो. जगातील आरोग्य संघटनेने आग्रह धरला आहे की नमुना निकाल पूर्ण पुष्टीकरणासाठी डाकार, सेनेगल येथील पाश्चर इन्स्टिट्यूटला पाठवावा. ही प्रयोगशाळा संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेसोबत काम करते.
मारबर्ग विषाणूची लस अद्याप विकसित केलेली नाही. जर हा आजार पसरला तर त्यावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण होईल. या विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांपर्यंत असल्याचे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे. आफ्रिकेसाठी डब्ल्यूएचओचे प्रादेशिक संचालक डॉ मात्शिदिसो मोएती यांनी जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मारबर्गमध्ये वेगाने पसरण्याची क्षमता आहे, त्यामुळे त्याचे संक्रमण लवकरात लवकर थांबवण्याची गरज आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार मारबर्ग विषाणू वटवाघळांच्या मानवी संपर्कामुळे पसरतो. एकदा एखाद्या व्यक्तीला मारबर्ग विषाणूची लागण झाली की, तो कोरोनाप्रमाणेच दुसऱ्यालाही संक्रमित करू शकतो. (हेही वाचा: 'जगातील जवळजवळ 99 टक्के मंकीपॉक्स प्रकरणे ही पुरुषांच्या समलिंगी लैंगिक संबंधाशी निगडीत'- Dr Ishwar Gilada)
लक्षणे-
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मारबर्ग विषाणूची लागण झालेल्या रुग्णामध्ये रक्तस्रावी तापाची लक्षणे दिसतात. रक्तस्रावी तापाची लक्षणे 2 ते 21 दिवसांदरम्यान दिसू शकतात. या विषाणूच्या लक्षणांमध्ये तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी यांचा समावेश होतो. तसेच स्नायू दुखणे, ओटीपोटात वेदना आणि पेटके, मळमळ आणि उलट्या (संसर्गानंतर तिसऱ्या आठवड्यात), संसर्ग झालेल्या काही रुग्णांमध्ये 7 दिवसांच्या आत नाक आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.
दरम्यान, सध्या जगभरातील शास्त्रज्ञ या विषाणूवर संशोधन करत आहेत. हा विषाणू मानवी शरीरात कसा प्रवेश करतो आणि कोणत्या अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो हे शोधण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. दक्षिण आफ्रिकेत या विषाणूची पुष्टी झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने लोकांना शरीर हायड्रेट ठेवण्याचा सल्ला दिला आहे.