गेल्या काही महिन्यांमध्ये लोकांचे मानसिक स्वास्थ्य (Mental Health) बिघडत चालले असल्याचे अनेक अहवाल समोर आले आहेत. कोरोना महामारीनंतर तर त्यामध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. आता एका नव्या रिपोर्टमध्ये दिसून आले आहे की, जगभरातील जवळजवळ 60% कामगारांना वाटते की, त्यांची नोकरी ही त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा सर्वात मोठा घटक आहे. सर्वेक्षण केलेल्यांपैकी लक्षणीय संख्येने असेही म्हटले आहे की, ते उच्च पगाराच्या नोकरीपेक्षा त्यांच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देतील. यासाठी ते कमी पगारावरही काम करण्यास तयार आहेत.
सर्वेक्षणानुसार, ‘मॅनेजर्स'चा लोकांच्या मानसिक आरोग्यावर त्यांच्या जोडीदाराइतकाच प्रभाव असतो (दोन्ही 69%). डॉक्टर (51%) किंवा थेरपिस्ट (41%) पेक्षा जास्त कामाचा मानसिक आरोग्यावर जास्त परिणाम होतो. अहवालात असाही अंदाज वर्तवला आहे की, जागतिक स्तरावर 40% सी-स्तरीय लीडर्स कामाशी संबंधित तणावामुळे पुढील 12 महिन्यांत नोकरी सोडतील. यूकेजीच्या वर्कफोर्स इन्स्टिट्यूटच्या 'मेंटल हेल्थ अॅट वर्क: मॅनेजर्स अँड मनी' (Mental Health at Work: Managers and Money) या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या अहवालातील हे निष्कर्ष आहेत.
या सर्वेक्षणात विविध प्रकारच्या पदावर असलेल्या 10 देशांतील कार्यरत लोकांचा समावेश करण्यात आला असून, त्यांच्याकडून उत्तरे घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, जगभरातील पाचपैकी एका कामगाराचा असा विश्वास आहे की त्यांच्या नोकरीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. जवळपास निम्म्या (57%) मॅनेजर्सनी सांगितले की, कोणीतरी त्यांना त्यांची सध्याची नोकरी न घेण्याचा इशारा दिला असता बरे झाले असते. जवळपास 46 टक्के मॅनेजर्सनी सांगितले की, कामाशी संबंधित ताणामुळे ते आपल्या नोकऱ्या सोडतील.
कामाच्या दिवसाच्या शेवटी, जवळपास 43% कर्मचारी 'अनेकदा' किंवा 'नेहमी' थकलेले असतात आणि 78% म्हणतात की या तणावाचा त्यांच्या कामाच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होतो. कामाचा हा ताण आपल्या वैयक्तिक जीवनावर (71%) आणि नातेसंबंधांवर (62%) नकारात्मक परिणाम करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. (हेही वाचा: Brain Stroke: भारतामध्ये 'स्ट्रोक' हे मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण; दर 4 मिनिटांनी होतो एका व्यक्तीचा मृत्यू)
दरम्यान, सध्या जगावर आर्थिक मंदीचे सावट आहे. अशात अनेक मोठ-मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. ज्या लोकांच्या नोकऱ्या टिकून आहेत, त्यांच्याकडून कमी वेळात जास्त कामाची अपेक्षा केली जात आहे. या सर्वांचा लोकांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे.