Lung Cancer: आपल्या निरोगी आयुष्यासाठी फुफ्फुस आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीराला ऑक्सिजन पुरवण्यासोबतच फुफ्फुसे कार्बन डायऑक्साइडसारखे इतर वायू बाहेर टाकण्याचेही काम करतात. पण या बदलत्या जीवनशैलीत आपण काही चुकीच्या सवयी अंगीकारत आहोत, ज्या आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत. यापैकी एक म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग. कर्करोग हा एक धोकादायक आजार असून त्याचे अनेक प्रकार आहेत, त्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाचा समावेश आहे. स्तन, तोंड आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगानंतर फुफ्फुसाचा कर्करोग हा चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे.
असे मानले जाते की, धूम्रपान हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वात मोठे कारण आहे, जे मोठ्या प्रमाणात खरेही आहे. पण एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, फुफ्फुसाच्या कर्करोगाने बळी पडलेल्या भारतीयांपैकी 50% लोक धूम्रपान देखील करत नाहीत. सध्या अनेक जण या आजाराच्या विळख्यात आहेत. त्याच वेळी, लोकांना अजूनही फुफ्फुसाच्या कर्करोगाबद्दल माहिती नाही. अशा परिस्थितीत आज 1 ऑगस्ट रोजी डब्ल्यूएचओतर्फे जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन साजरा केला जात आहे.
वैद्यकीय अहवाल दर्शवितात की, भारतीय पुरुषांमध्ये कर्करोगाच्या मृत्यूचे सर्वात सामान्य कारण फुफ्फुसाचा कर्करोग आहे. येथे, फुफ्फुसाचा कर्करोग सर्व प्रकारच्या कर्करोगांपैकी 5.9% आणि कर्करोगाशी संबंधित मृत्यूंपैकी 8.1% साठी जबाबदार आहे. फुफ्फुसाचा कर्करोग कोणत्याही वयोगटातील आणि लिंगाच्या लोकांना होऊ शकतो, परंतु पुरुषांमध्ये हा धोका जास्त असल्याचे दिसून येते. भारतामध्ये दरवर्षी सुमारे एक लाख नवीन फुफ्फुस कर्करोग रुग्णांचे निदान होते. (हेही वाचा: Teflon Flu: सावध व्हा! नॉनस्टिक भांड्यांमधून पसरत आहे 'टेफ्लॉन फ्लू'; 250 लोकांना झाली लागण, जाणून घ्या कशी घ्याल काळजी)
द लॅन्सेट रीजनल हेल्थ साउथईस्ट एशिया जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे बहुतेक रुग्ण असे आहेत ज्यांनी कधीही धूम्रपान केले नाही. आशिया आणि पश्चिमेच्या इतर भागांच्या तुलनेत, दक्षिण-पूर्व आशियामध्ये धूम्रपानाचा इतिहास नसलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. वाढते वायू प्रदूषण हे यामागे कारण असू शकते, असे संशोधकांचे मत आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाचा दर, जो 1990 मध्ये प्रति लाख लोकांमध्ये 6.62 होता, तो 2019 मध्ये वाढून 7.7 झाला आहे.
(टीप- वरील लेख इंटरनेट आधारीत आहे. लेटेस्टली मराठी लेखात दिलेल्या माहितीबाबत पुष्टी करत नाही. संबंधित रोगाबद्दल अधिक तपशीलांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)