Representational Image (Photo Credits: Pixabay)

सध्या संपूर्ण भारतभर कोविड-19 लसीकरण मोहिम (Covid-19 Vaccination Drive) सुरु आहे. येत्या 28 एप्रिल पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. परंतु, देशात वाढणाऱ्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे आरोग्य सुविधांचा तुडवटा देखील जाणवत आहे. यातच व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter) यांसारख्या सोशल मीडिया माध्यमात पसरणाऱ्या विविध मेसेजेसमुळे लोकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिलांनी मासिक पाळीच्या पाच दिवसांपूर्वी आणि पाच दिवसांनंतर लस घेऊ नये, असे म्हटले आहे. या मेसेजमुळे लसीकरणाबाबत महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

ही पोस्ट सुरुवातीला व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली. त्यानंतर सोशल मीडियाच्या इतर माध्यमांत ही पोस्ट पसरत गेली. या पोस्टचे टायटल ‘Reminder For All Women' असं आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण सुरु होणार आहे. लस घेताना आपल्या पीरियड्सच्या तारखेची काळजी मुलींनी घेणे गरजेचे आहे. तुमच्या पीरियड्सच्या पाच दिवस आधी आणि पाच दिवस नंतर मुलींना लस घेऊ नये, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. लस घेतल्यामुळे तुमची इम्युनिटी आधी कमी होते आणि पुन्हा नव्याने तयार होते. त्यामुळे तुम्हाला कोविड-19 ची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून लस घेण्यापूर्वी मुलींना काळजी घ्यावी, असे या व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे.

मासिक पाळी दरम्यान लस घेणे योग्य आहे का?

कोविड-19 लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर काही महिलांच्या पाळीच्या तारखांमध्ये बदल दिसून आला आल्याचे काही रिपोर्टमधून समोर आले आहे. परंतु, कोविड-19 लस आणि मासिक पाळीचे चक्र बिघडण्याचा काही संबंध नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे. (लस निवडीचा पर्याय असतो का? ते स्मार्टफोन नसल्यास रजिस्ट्रेशन कसं करायचं? CoWIN Portal वर लसीच्या रजिस्ट्रेशन बाबत काही प्रश्नांची उत्तरं इथे घ्या जाणून)

डॉ. मुंजाळ कपाडीया यांनी खोटी माहिती पसरवणाऱ्या अशा व्हॉट्सअॅप मेसेजेंना बळी न पडता लस घेण्याचे आवाहन लोकांना केले आहे. या व्हायरल मेसेजेसमुळे महिलांना लस घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारच्या मेसेजवर विश्वास न ठेवता लवकरात लवकर लस घ्या, असे डॉ. कपाडीया यांनी म्हटले आहे.

कोविड-19 लस आणि मासिक पाळी:

येल स्कूल ऑफ मेडिसिन (Yale School of Medicine) चे एलिस लू-कुलिगन आणि डॉ. रैंडी हटर एपस्टीन (Alice Lu-Culligan and Dr. Randi Hutter Epstein) यांनी न्युयॉर्क टाईम्सशी बोलताना सांगितले की, कोविड-19 लसीमुळे तुमच्या मासिक पाळीत बदल होईल, असा कोणताही डेटा अद्याप हाती आलेला नाही. तसंच लसीकरणानंतर तुमचे मासिक पाळीचे चक्र बदलले तरी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.

सध्या मासिक पाळी दरम्यान लस घेण्याबाबत डॉक्टर, मेडिकल तज्ञ आणि सरकारकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाही. लस घेतल्यामुळे मासिक पाळीच्या तारखांमध्ये बदल दिसून येऊ शकतो. परंतु, हे immune system बळकट होण्याचे एक लक्षण आहे, असे डॉ. Dr. Gunter यांनी म्हटले आहे. त्यामुळे महिलांनी या मेसेजेवर विश्वास न ठेवता वेळीच लस घ्यावी.