धकाधकीच्या आयुष्याला आणखीनच खडतर बनवण्यासाठी गेल्या काही वर्षात एका आजाराचे प्रस्थ जगभरात वाढताना दिसत आहे, तो आजार म्हणजे उच्च रक्तदाब (High Blood Pressure). साधारणतः मधुमेह (Diabetes) , कोलेस्ट्रॉल (Choloestrol), वाढतं वय किंवा वजन (Obesity) या बाबींना जोडून येणाऱ्या या विकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास जीवावरही बेतू शकते. रक्तदाबाचे मुख्य कारण हे तणाव व अनियमित जीवनशैली मानले जाते, स्पर्धात्मक युगात या दोन गोष्टी इतक्या सामान्य झाल्या आहेत कि त्यामुळे नकळतच आरोग्याला ही रक्तदाबाची व्याधी जोडली जाते. हा आजार दीर्घकालीन असून यामुळे हृदय, मेंदू व मूत्रपिंडाच्या आजारांना आमंत्रण दिले जाते. रक्तदाबाच्या बाबत आणखीन एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या आजाराची लक्षणे अतिशय सामान्य आहेत, त्यामुळे बऱ्याचदा या लक्षणांना थकव्याच्या नावाखाली दुर्लक्षित केलं जातं.
विविध देशांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, एकंदर लोकसंख्येच्या 10 ते 25 % लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण आढळते.आणि यावर उपाय न केल्यास येत्या 2020 पर्यंत उच्च रक्तदाब हा अपंगत्वाचे प्रमुख कारण म्ह्णून समोर येऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या आजाराला वेळीच रोख लावण्यासाठी सुरवातीला आपण याची लक्षणे जाणून घेऊयात..
1- तीव्र डोकेदुखी व मानेचे दुखणे
उच्च रक्तदाब हा आजार झाल्यास सुरवातीला व्यक्तीच्या डोक्याच्या मागील बाजूला वेदना होऊ लागतात तसेच सातत्याने मानदुखी सुद्धा होते. कित्येकदा डोक्यात तीव्र कळा देखील जाणवतात.
2- चक्कर येणे व थकवा
आजारी व्यक्तीला काहीश्या कामानंतरही खूप थकवा जाणवू लागतो, तसेच वारंवार चक्कर येणे, आसपासच्या वस्तू हलत असल्याचा भास होणे, कामात लक्ष केंद्रित न होणे, एकाग्रता न होणे, चिडचिड करणे ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत.
3- अंधुक दृष्टी
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीच्या नजरेवर सुद्धा परिणाम होतो, यामुळे जवळच्या वस्तूही अंधुक दिसू लागतात. अनेकदा एका जागी दोन वस्तू दिसणे असाही अनुभव येऊ शकतो.
4- निद्रानाश
जर का तुम्हाला रात्रभर झोप येत नसेल अथवा काही वेळ झोपल्यावर याचा का दचकून जग येत असेल तर हे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. यामध्ये झोपल्यावर सतत अस्वस्थ वाटत राहते
5- रक्तस्त्राव
रक्तदाब असल्यास व्यक्तीला अनेक वेळा विनाकारण रक्तस्त्राव होऊ शकतो. अधिक वेळ उन्हात राहिल्यास नाकातून,लघवीमधून, मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत.
रक्तदाब हा आजार सुरवातीला या लहानसहान लक्षणातून ओळखता येऊ शकतो, अगदी सुरवातीलाच या आजाराचे निदान झाल्यास आपण प्राथमिक व घरगुती उपचारांनी रातदाबाला नियंत्रित ठेवू शकतो. चला तर पाहुयात काय आहेत हे उपाय..
- जेवणातील मीठाचा वापर प्रामुख्याने कमी करावा, रोजच्या जेवणात जेवलं तीन ते पाच ग्राम मीठाचे सेवन केल्यास रक्तदाब आटोक्यात राहू शकतो.मिठाऐवजी लिंबाचा रस, मिरे, मोहरी, जिरे हे पदार्थ वापरल्यास उणीव भासणार नाही.
- खसखस आणि टरबूजाच्या बियांचा गार वेग-वेगळे वाटून समप्रमाणात मिसळून ठेवावे. सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी खाल्याने वाढलेला रक्तदाब कमी होतो व रात्री झोप सुद्धा चांगली लागते.
- एक चमचा मेथीच्या दाण्याचे चूर्ण सकाळ संध्याकाळ रिकाम्या पोटी घेतल्यास (आठवडाभर) उच्च रक्तदाब कमी होतो.
- मनुका सोबत लसणाची पाकळी खाल्याने आराम येतो.
- तुळशीचे चार पाने, लिंबाची दोन पाने, दोन चमचे पाणी घेऊन एकत्र वाटावी. रिकाम्यापोटी घेतल्याने उच्च रक्तदाब कमी होतो.
- तेलयुक्त व मसालेदार तसेच मांसाहाराचे सेवन टाळावे, त्याऐवजी आहारात लसूण, कांदा, ताजी फळे व भाज्या यांचा समावेश करावा. किंवा जेवणात सोयाबीनच्या तेलाचा वापर करावा.
- दुगधजन्य पदार्थापासून जरा दूरच राहा, चहा कॉफी केक, आईक्रीम, चॉकलेट, सुकामेवा, हे पदार्थ सुद्धा टाळावेत.
- रक्तदाब कमी करण्यासाठी व्यायाम-योगासने करणे आवश्यक आहे. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.
- भरभर चालणे, पोहणे, सायकल चालवणे, एरॉबिक्स, धावणे यात हृदयाची कार्यक्षमता व सहनशक्ती वाढते आणि रक्तवाहिन्यांतून रक्त वेगाने धावते.
- मद्यपान प्रकर्षाने टाळा
याशिवाय तुमच्या जीवनशैलीत थोडीशी शिस्त आणि नियमितता आणल्यावर केवळ रक्तदाबाचं नाही तर इतरही आजारांपासून लांब राहता येते. तसेच या आजराने ग्रस्त लोकांनी नियमित तपासणी करून घ्यावी.
(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)