COVID-19 Vaccine in India: पहिल्या टप्प्यात तब्बल 3 कोटी नागरिकांना देण्यात येणार लसीचा डोस; आरोग्य सेवकांना प्राधान्य
Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

देशात गेल्या 7-8 महिन्यांपासून कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट ठाण मांडून आहे. त्यामुळे लसीच्या (Vaccine) विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, लसीसंबंधित महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, लस विकसित झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लसीचा डोस देण्यात येईल. यात आरोग्य सेवक (Frontline Health Workers) प्राधान्य क्रमावर असतील, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसंच लस देण्याचा पहिला टप्पा जानेवारी ते जून 2021 पर्यंत असेल. (Bharat Biotech, Serum Institute of India कडून COVID-19 ला रोखण्यासाठी Intranasal Vaccines ची निर्मिती; जाणून लसीच्या या प्रकाराबद्दल आणि त्याच्या अपडेट्स विषयी!)

लस उपलब्ध झाल्यानंतर 70 लाख डॉक्टर्स आणि पॅरामेडिक्स यांना पहिल्या टप्प्यात लसीचा डोस देण्यात येईल, असे हेल्थ सेक्रेटरी राजेश भूषण यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले. त्यासाठी लागणारी सामुग्री आपल्याकडे उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या सुरु असलेल्या लसीच्या ट्रायल्स योजनेनुसार यशस्वी झाल्यास जानेवारी ते जून 2021 पर्यंत उपलब्ध होणाऱ्या लसी प्राधान्यक्रमवारीत असलेल्यांसाठी पुरेशी ठरेल, असेही ते म्हणाले.

भारतात गेल्या 50 वर्षांपासून Universal Immunisation Programme यशस्वीपणे सुरु आहे. त्या अंतर्गत तब्बल 2.5 कोटी मुलं, प्रौढ यांना वर्षभरात लसी दिल्या जातात. या प्रोग्रॅम अंतर्गत देशात 28,000 हून अधिक cold storages आहेत. ज्यात लसी स्टोर करतात. या सर्व सुविधा केंद्रांमध्ये तापमान नियंत्रक आहेत. ज्यामुळे वेळोवेळी माहिती सेंट्रलाईज सर्व्हरला अपलोड केली जाते, असेही ते म्हणाले.

दरम्यान, यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोविड-19 लसीच्या पुरवठ्याबद्दल सरकारचे धोरण ठरलेले नसल्याची टीका केली होती. तर महिन्याभरापूर्वी सीरम इंस्टिट्युडचे अदर पुनावाला यांनी देखील लसीच्या खरेदी आणि वितरणासाठी लागणाऱ्या सरकारच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान, काही दिवासांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 लसीच्या वितरणाचा आढावा घेतला असून लसीच्या जलद पुरवठ्यासाठी पूर्वतयारीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.