जगभरामध्ये जीवाघेण्या कोरोना व्हायरसची दहशत वाढत आहे. चीन पाठोपाठ इराण, इटली मध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. भारतामध्येही 148 जण कोरोनाबाधित आहेत तर त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. WHO ने देखील COVID 19 ला जागतिक आरोग्य संकट जाहीर केल्यानंतर या आजाराबाबतची भीती अधिकच वाढली आहे. अनेकजण कोरोना व्हायरसपासून बचावण्यासाठी मास्क घालून फिरत आहेत. मुंबई, पुण्यासह जगभरात सामान्यांमध्ये कोरोना व्हायरसची भीती असल्याने त्याचा काळाबाजारदेखील होत आहे. मात्र खरंच हॅन्ड सॅनेटायझर किंवा मास्कचा वापर हा कोरोना व्हायरसला रोखण्याचा उपाय नव्हे तर केवळ खबरदारीचा पर्याय आहे. त्यामुळे खरंच मास्क कसा आणि कुणी वापरायचा? मास्कचा वापर केल्यानंतर तो विघटीत कसा करायचा याबाबतच्या लहान सहान प्रश्नांवर भारताच्या आरोग्य मंत्रालय आणि प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रत्येकाने मास्क वापरताना ही काळजी घेणं आवश्यक आहे.
मास्क वापरण्याची खरंच गरज कुणाला आहे?
आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रत्येकाला मास्क वापरण्याची गरज नाही. मास्क वापरण्याचा सल्ला केवळ कफ, खोकला, सर्दी, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींना, COVID 19चे बाधित आणि संशयित रूग्ण यांची काळजी घेणारे तसेच श्वसन विकाराच्या रूग्णांना हाताळणार्या वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना दिला गेला आहे. Coronavirus: बाजारात 'मास्क' उपलब्ध नसतील तर 'या' सोप्या पद्धतीने बनवा 'घरगुती मास्क': पहा व्हिडिओ.
मास्क वापरत असताना कोणती काळजी घ्याल?
- मास्क वरील घड्या (Pleats)उघडा. तोंडावर मास्क लावताना त्या घड्या खालच्या दिशेला झुकलेल्या असणं आवश्यक आहेत.
- मास्क भिजल्यानंतर आणि किमान 6 तासांनंतर बदलणं आवश्यक आहे.
- N95 किंवा इतर मास्क लावताना ती नाक, तोंड आणि हनुवटी जवळचा भाग झाकलतील अशा स्थितीत लावा. चेहर्याच्या या भागाच्या आजूबाजूच्या भागातून हवा आत- बाहेर जाणार नाही इतका तो घट्ट असणं आवश्यक आहे.
- एकदा वापरलेला डिस्पोजेबल मास्क पुन्हा घालणं टाळा. घातलेला मास्क देखील निर्जंतूक करून कचर्याचा बंद डब्ब्यात टाका.
- मास्क घातल्यानंतर त्याला वारंवार हात लावणं टाळा.
- मास्क काढताना देखील त्याच्या बाहेरील भागाला जेथे विषाणू असू शकतात असा भागला हात लावत तो काढणं टाळा.
- मास्क गळ्यात लोंबत ठेवू नका.
- मास्क काढल्यानंतर हात किमान 20 सेकंद साबण आणि पाणी किंवा हॅन्ड सॅनिटायझरने स्वच्छ धुणं आवश्यक आहे.
Stay informed, stay protected and don't panic!
Everyone need not to wear a mask😷 unless one have respiratory symptoms like fever/cough/runny nose🤧#IndiaFightsCorona #CovidIndia pic.twitter.com/fDpj1zqJkz
— PIB India (@PIB_India) March 18, 2020
कोरोना व्हायरसची लागण ही प्रामुख्याने शिंकताना, खोकताना उडालेल्या थुंकीद्वारा पसरत आहे. त्यामुळे अशावेळेस तुमचे तोंड रूमालाने किंवा हाताच्या बाह्याने झाकलेले असणं आवश्यक आहे. सामान्यांना केवळ रूमाल तोंडावर धरणं पुरेसे असल्याचं सांगण्यात आले आहे. मात्र वारंवार हात स्वच्छ करणं आवश्यक आहे. तुम्हांला कोरोना व्हायरसची लक्षणं दिसल्यास तात्काळ नजिकच्या सरकारी रूग्णालयाला भेट द्या. असं आवाहनदेखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)