Cancer Capital of The World: भारत बनला 'जगातील कॅन्सरची राजधानी'; कर्करोग प्रकरणांमध्ये होत आहे झपाट्याने वाढ, अहवालात समोर आली धक्कादायक माहिती
देशात अजूनही कर्करोगाच्या लक्षणांबद्दल मर्यादित जागरूकता आहे. व्यापक स्क्रीनिंग प्रोग्रामचा अभाव आहे, यामुळे बहुतेक वेळा याचे निदान वेळीच होत नाही. परिणामी त्याचे पुढील टप्प्यावर निदान झाल्याने यशस्वी उपचारांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.
Cancer Capital of The World: कर्करोग (Cancer) हे जागतिक स्तरावर मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. दरवर्षी, लाखो लोकांना कर्करोगाचे निदान होते आणि तितकेच लोक कर्करोगामुळे मृत्युमुखी पडतात. 2050 पर्यंत ही आकडेवारी झपाट्याने वाढेल असा अंदाज अभ्यासांनी वर्तवला आहे. कर्करोगाच्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये जगभरात कर्करोगाच्या अंदाजे 20 दशलक्ष (दोन कोटी) नवीन प्रकरणांचे निदान केले गेले आणि 9.7 दशलक्ष (97 लाख) पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला.
इतकेच नाही तर, संशोधकांचा अंदाज आहे की 2050 सालापर्यंत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दरवर्षी 35 दशलक्ष (3.5 कोटी) पर्यंत पोहोचू शकते. गेल्या दशकातील आकडेवारीवरून असे दिसून येते की, भारतातही या गंभीर आणि जीवघेण्या आजाराची प्रकरणे वर्षानुवर्षे झपाट्याने वाढत आहेत. आता अपोलो हॉस्पिटल्सने जागतिक आरोग्य दिन 2024 निमित्त प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारताला ‘जगातील कर्करोगाची राजधानी’ अशी भयंकर पदवी देण्यात आली आहे.
भारतामध्ये एक तृतीयांश लोक प्री-डायबेटिक आहेत, दोन तृतीयांश प्री-हायपरटेन्सिव्ह आहेत आणि दहापैकी एक डिप्रेशनशी झुंजत आहे. कर्करोग, मधुमेह, हृदयविकार आणि मानसिक आरोग्य समस्यांसह या दीर्घकालीन परिस्थिती गंभीर पातळीवर पोहोचत आहेत आणि देशाच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम करत आहेत. यातील विशेष चिंतेची बाब म्हणजे कर्करोगाच्या प्रकरणांची वाढती संख्या, जी जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. (हेही वाचा: Affordable Gene Therapy For Cancer: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील पहिल्या स्वदेशी CAR T-Cell थेरपीची सुरुवात; स्वस्तात होणार कर्करोगावर उपचार)
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (NCDIR) च्या मते, गेल्या काही वर्षांपासून भारतात कर्करोगाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तंत्रज्ञान आणि वैद्यकातील नवनवीन शोधांमुळे कर्करोग हा आता असाध्य रोग राहिला नसला तरीही, वैद्यकीय खर्चामुळे कर्करोगावरील उपचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचणे कठीण आहे.
भारतातील कर्करोगाचे उच्च प्रमाणासाठी जीवनशैली, पर्यावरणीय आणि सामाजिक आर्थिक आव्हाने, तंबाखूचा सर्रास वापर, धुम्रपान आणि धूररहित दोन्ही प्रकारांच्या संपर्कात येणे शिवाय, वाहने आणि उद्योगांमुळे होणारे वायू प्रदूषण अशी विविध कारणे समोर आली आहेत. यासह प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांकडे कल आणि शारीरिक हालचालींचे कमी प्रमाण हेदेखील यामागे एक मुख्य कारण आहे. देशात अजूनही कर्करोगाच्या लक्षणांबद्दल मर्यादित जागरूकता आहे. व्यापक स्क्रीनिंग प्रोग्रामचा अभाव आहे, यामुळे बहुतेक वेळा याचे निदान वेळीच होत नाही. परिणामी त्याचे पुढील टप्प्यावर निदान झाल्याने यशस्वी उपचारांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.
(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2024 10:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

