मराठी पाऊल पडते पुढे! ठाण्यात होत आहे मातीविना शेती; जाणून घ्या फक्त पाण्याचा वापर करून स्वच्छ आणि पोषक पालेभाज्या उत्पादित करणाऱ्या Swapnil Shirke यांच्या IndiRoots स्टार्टअप बाबत
IndiRoots Hydroponics Farm (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशात कोरोना विषाणू महामारीनंतर लोक आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. सर्वसाधारणपणे आता पौष्टिक आणि शुद्ध अन्न तसेच हिरव्या पालेभाज्या, फळे खाण्यास जास्त प्राधान्य दिले जात आहे. विशेषतः शहरांमध्ये हा ट्रेंड वाढत चालला आहे. त्यामुळेच अनेकजण आपल्या किचन गार्डनमध्ये, बाल्कनीमध्ये, अगदी टेरेसवर भाजीपाला पिकवू लागले आहेत. हे बदलाचे वारे पाहता महाराष्ट्रातील ठाणे येथील स्वप्नील शिर्के यांनी इंडिरूट्स हायड्रोपोनिक्स फार्म (IndiRoots Hydroponics Farm) या स्टार्टअपची उभारणी केली. या स्टार्टअपद्वारे एका नियंत्रित वातावरणात उच्च दर्जाच्या स्वच्छ आणि पोषक पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते.

‘हायड्रोपोनिक’ हा ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ मातीशिवाय फक्त पाण्याचा वापर करून अन्नधान्य उगवणे. हा शेतीचा एक आधुनिक प्रकार आहे. यामध्ये पाण्याचा आणि पोषक तत्वांचा वापर करून मातीविना लागवड केली जाते. अशाप्रकारच्या शेतीमध्ये हवामान नियंत्रित करून, तापमान 15-30 अंश आणि आर्द्रता 80-85 टक्के ठेवली जाते. पाण्याद्वारे वनस्पतींना पोषक तत्वे पुरवली जातात. या लागवडीचे अनेक प्रकार आहे परंतु इंडिरूट्स येथे डीप वॉटर कल्चर (Deep Water Culture) या पद्धतीचा अवलंब केला जातो. डीप वॉटर कल्चर तंत्रज्ञान हे जागतिक स्तरावर स्वीकृत आणि अधिक परवडणारे आहे.

IndiRoots Hydroponics Farm

डीप वॉटर कल्चर ही वनस्पती उत्पादनाची हायड्रोपोनिक पद्धत आहे. यामध्ये आयताकृती टाकी वापरली जाते ज्यावर स्टायरोफोम बोर्ड टाकले जातात. या बोर्डखाली पोषणमुल्ये असलेल्या ऑक्सिजनयुक्त पाण्याच्या द्रावणात झाडाची मुळे सोडली जातात. पिकांची मुळे या पाण्यामध्येच राहतात व हे पाणी दर 2-3 दिवसांनी बदलले जाते. या पाण्यात झाडाला लागणारे सर्व पोषक घटक मिसळलेले असतात. अशाप्रकारे मातीविना पिकांचे उत्पादन घेतले जाते.

या शेतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही यामुळे जवळपास 90 टक्के पाण्याची बचत करू शकता. हवामानातील बदल, जमिनीची टंचाई, पिकांवर खते आणि कीटकनाशकांचा होत असलेला मारा, प्रदूषण यांमुळे स्वच्छ अन्नपदार्थ मिळण्याची शक्यता दुरपास्त झाली होती. तसेच भाज्यांची होत असलेली आयात-निर्यात, पुढे व्यापारी-दलाल यांच्यामार्फत घरात येणारा भाजीपाला किंवा फळे हे कितपत खाण्यायोग्य आहेत हाही मोठा प्रश्न होता. मात्र स्वप्नील शिर्के हे ‘इंडिरूट्स’च्या माध्यमातून मातीशिवाय स्वच्छ तितकेच पोषक पालेभाज्यांची लागवड करून त्यांचा पुरवठा करत आहेत.

IndiRoots Hydroponics Farm

साधारण 10,000 स्क्वेअर फुटांमध्ये पसरलेले इंडिरूट्स हे आधुनिक पिढीचे एक आगळेवेगळे कृषी स्टार्टअप आहे. हे ठाण्यातील सर्वात मोठे फंक्शनल हायड्रोपोनिक्स फार्म असून, या ठिकाणी निर्जंतुकीकरण, सीलबंद आणि तंत्रज्ञानाच वापर करून दर आठवड्याला मोठ्या प्रमाणावर पिकांचे उत्पादन घेतले जाते. या ठिकाणी विविध प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या, स्वच्छ RO फिल्टर केलेल्या पाण्यात, सूक्ष्म पोषक घटकांचा पुरवठा करून पिकवल्या जातात. महत्वाचे म्हणजे अशा प्रकारच्या शेतीमध्ये पिकांची चवही अबाधित राहते.

सध्या संपूर्ण ठाण्यातील शहरी आणि उपनगरी भागात वर्षभर या भाज्या पुरवल्या जात आहेत. इंडिरूट्स लवकरच महाराष्ट्राच्या इतर भागातही याचा विस्तार करणार आहे. (हेही वाचा: COVID-19 Vaccine Update: जापनीज फार्मा कंपनी Mitsubishi Tanabe लवकरच लॉन्च करणार वनस्पतीवर आधारित कोविड-19 लस)

इंडिरूट्सद्वारे पिकवलेल्या भाज्या तुम्ही थेट त्यांच्याकडून विकत घेऊ शकता किंवा भाज्या पुरवणाऱ्या अनेक व्हेंडर्सकडे सुद्धा त्या सहज उपलब्ध होऊ शकतात. जे लोक आपल्या आरोग्याबाबत अतिशय जागरूक आहेत त्यांच्यासाठी इंडिरूट्सच्या पालेभाज्या वरदान ठरू शकते. इंडिरूट्स तुम्हाला त्यांच्या फार्ममध्ये उत्पादित केलेल्या भाज्या वापरून तयार करण्यात आलेल्या, 'सलाद बॉक्स'चाही पर्याय देते. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या निवडू शकता. इंडिरूट्स येथे पालक, पुदिना, कोथिंबीर, ओरेगॅनो, ओवा, स्विस चार्ड, पाकचोई, तुळस, चेरी टोमॅटो, देसी टोमॅटो, झुचीनी, सिमला मिरची, मोहरी, बीटरूट अशा अनेक भाज्या पिकवल्या जातात.

अशाप्रकारे हायड्रोपोनिक्स हे शेतीचे भविष्य आहे आणि इंडिरूट्स त्याचा पाया घालत आहेत. दरम्यान, स्वप्नील शिर्के एक व्यावसायिक असून ते शिक्षण, वित्त, शेती अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी 2018 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर, गुरुग्राम, दिल्ली येथून हायड्रोपोनिक्स वर आधारीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर 2020 मध्ये भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचाही प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला.