Hanuman Jayanti 2019: हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी अर्पण केल्या जातात या गोष्टी; जाणून घ्या योग्य पद्धत आणि महत्व
हनुमान जयंती (File Image)

नुकतेच राम नवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला, आता वेध लागले आहेत ते हनुमान जयंतीचे (Hanuman Jayanti). महाराष्ट्रात यंदा 19 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी होणार आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. यादिवशी हनुमानाच्या पूजेचे विशेष महत्व असते, हनुमानाला आवडत्या गोष्टी अर्पण करून त्याला प्रसन्न करून घेतले जाते. हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. हनुमानाचा यक्षोपासनेशी जवळचा संबंध आहे, यक्ष हे रोग, भूतबाधा, वांझपण घालवतात अशी समजूत आहे. हनुमानाची उपासना याचसाठी केली जाते. तर ही उपासना योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे, त्यासाठी जाणून घ्या हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आणि कशाप्रकारे अर्पण करतात.

शेंदूर, रुईची पाने आणि फुले, तसेच तिळाचे तेल यांमध्ये हनुमानाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता सर्वांत जास्त असल्याने या वस्तू हनुमानाला अर्पण कराव्यात.

> रुईची पाने – रुईच्या पानांमध्ये देवतेची पवित्रके, म्हणजे देवतेचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा जास्त असते, त्यामुळे रुईच्या 11 पानांची माळ हनुमानाला अर्पण करावी.

> नारळ - मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. नारळ अर्पण करण्यापूर्वी मारुतीच्या मूर्तीसमोर नारळाची शेंडी धरावी, त्यानंतर नारळ वाढवून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा व अर्धा भाग तेथेच अर्पण करावा.

> प्रदक्षिणा - प्रदक्षिणा नेहमी घड्याळाच्या काट्यांच्या दिशेनेच घालावी. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी.

> तेल - मारुतीच्या उपासनेने शनिग्रहपीडाही दूर करता येते, यासाठी एका वाटीत तेल घ्यावे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या तेलात स्वत:चा चेहरा पहावा. मग ते तेल मारुतीला वाहावे. हे तेल शक्यतो आपल्या घरातून घेऊन जावे.  (हेही वाचा: हनुमान जयंती निमित्त करा हे उपाय, पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा

> अगरबत्ती - हनुमानाची पूजा करतांना हनुमानाचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणार्‍या केवडा, चमेली आणि अंबर या गंधांच्या उदबत्त्या वापराव्यात.

> कणकेचे दिवे -  स्त्रिया पुत्रप्राप्तीसाठी मारुतीची उपासना करतात. त्यासाठी भिंतीवर शेंदूराने मारुतीची आकृती काढून त्याची पूजा केली जाते. तसेच त्याच्यापुढे चढते-उतरते, कणकेचे दिवे लावले लावून, त्याला उडीद वा मीठ अर्पण केले जाते.

समर्थ रामदासस्वामींचा 13 कोटी रामनामाचा जप पूर्ण झाल्यावर मारुती त्यांच्यासमोर प्रगट झाला आणि त्या दर्शनानंतर स्वामींनी मारुतीस्त्रोत (भीमरूपीस्तोत्र) रचले. या स्तोत्रात रामदासस्वामींनी विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्याची स्तुती केली आहे. हनुमान जयंतीला हे स्तोत्र पठण करणार्‍याला धनधान्य, पशूधन, संतती या सार्‍याचा आणि उत्तम रूपविद्यादीकांचा लाभ होतो.