Rani LakshmiBai 161 Death Anniversary: 'खूब लड़ी मर्दानी, वो तो झांसी वाली रानी थी' अशा सुंदर शब्दांत ज्या रणरागिनीचे वर्णन केलयं त्या वीरांगणेची म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची आज 161 वी पुण्यतिथी. तडफदार व्यक्तिमत्व, देशसेवेसाठी स्वत:ला झोकून देणारी, प्रसंगी आपल्या कुटूंबाला, रुढी-परंपरांना न जुमानता स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपुर्ण भूमिका बजावणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1835 रोजी वाराणसी च्या भदैनी गावात झाला. आपल्या दत्तक पुत्राला पाठीशी बांधून इंग्रजांशी दोन हात करत असताना 18 जून 1858 रोजी राणी लक्ष्मीबाईंचे निधन झाले. ‘मेरी झाशी नही दुंगी’ अशी गर्जना करून तिने १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. या स्वातंत्र्य युद्धाची ती खरी स्फूर्तीदेवताच ठरली. अशा या थोर क्रांतिकारी वीरांगणेचे करावे तितके कौतुक कमीच आहेच. मात्र आजही या वीरांगणेबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित आपल्याला माहित नसतील. चला तर जाणून घेऊया राणी लक्ष्मीबाईंविषयी 10 अकल्पित गोष्टी:
1. झाशीच्या राणीचे नाव मणिकर्णिका असे होते. परंतू लाडाने त्यांना मनू असे संबोधले जात असत. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथीबाई असे होते.
2. बालपणापासूनच राणी लक्ष्मीबाई यांना तलवारबाजी, घोडेस्वारीची आवड होती. चूल आणि मूल यात अडकून राहण्यापेक्षा त्यांना घोडेस्वारी, नेमबाजी आणि तलवारीबाजी शिकण्यात रस होता. त्यांच्या या लढवय्येपणामुळे त्यांना अनेकदा वडिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत.
3. धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म कोणत्याही राजघराण्यात झाला नव्हता, तरीही राजघराण्याशी संबंधित लोकांमध्ये वाढल्याने त्यांना युध्दनितीचे आणि राजकारणाचे संपूर्ण ज्ञान होते. राणी लक्ष्मीबाई या घोडस्वारीत अव्वल होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व झाशीची राणी या तिघांशिवाय कोणीही अचूक घोडस्वारी करू शकत नव्हते.
4. त्यांचे पती झाशीचे राजा गंगाधरराव नेवाळकर यांच्या निधनानंतर वयाच्या 18 वर्षी त्या झाशीच्या राजगादीवर बसल्या. आणि झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
5. पतीच्या निधनानंतर 'पतीबरोबर सती जाणे' आणि 'केशवपन करणे' या दोन्ही रिती-परंपरांचा त्याग करुन राणी लक्ष्मीबाई झाशीच्या गादीवर बसल्या. त्यावेळी त्यांना सासरच्या तसेच लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.
6. लक्ष्मीबाईंचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले.
7. त्यांनी लढलेल्या युद्धात ह्युज रोज हा वरिष्ठ ब्रिटीश आर्मी ऑफीसर होता. त्याने राणीचे वर्णन चाणाक्ष, सुंदर आणि देखण्या असे केले होते.
8. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.
9. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी ‘मल्लखांब’ नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला.मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.
10. अशा या लढवय्या, वीरांगणेच्या स्मरणार्थ 1957 मध्ये 2 पोस्टल स्टँम्प्स सुरु करण्यात आले.
जगभर पसरलेल्या क्रांतिकारकांना, सरदार भगतसिंग यांच्या संघटनेला आणि सरतेशेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेला याच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्याने स्फूर्ति दिली. हिंदुस्थानच्या अनेक पिढ्यांना स्फूर्ति देत झाशीच्या राणी अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात अमर झाल्या. अशा वीरांगना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या लेटेस्टली मराठी कडून शतश: प्रणाम.