राणी लक्ष्मीबाई जन्मदिन विशेष : आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटवणाऱ्या वीरांगनेची गाथा
राणी लक्ष्मीबाई (Photo Credits: Wikimedia Commons)

कडकडा, कडाडे बिजली, शत्रुंची लष्करे थिजली। मग कीर्तीरूपे उरली, ती पराक्रमाची ज्योत मालवे, इथे झांशीवाली।।

भा.रा.तांबे यांच्या लेखणीतून राणी लक्ष्मीबाई यांच्यासाठी उतरलेल्या या चपखल ओळी, कमी शब्दांत खूप काही सांगून जातात. आजच्या काळात जिथे स्त्रियांवर इतकी बंधने घातली जातात, तिथे 18 व्या शतकाच्या शेवटी या सौदामिनीने आत्मविश्र्वासाने, स्वकर्तृत्वाने, चातुर्याने, पराक्रमाने, स्वाभिमानासह, स्वराज्यासाठी इंग्रजांशी असामान्य असा लढा दिला. आणि आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटविला. चला तर पाहूया काय होती या वीरांगनेची गाथा

जन्म आणि बालपण - 

महाराष्ट्रातील पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला असणार्‍या मोरोपंत तांबे यांची ही मुलगी... मनकर्णिका म्हणजेच मनु ! मोरोपंत तांबे व भागिरथीबाई या दांपत्याच्या पोटी कार्तिक वद्य 14, शके 1757 म्हणजे इंग्रजी कालगणनेनुसार 19 नोव्हेंबर 1835 ला लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला.

दुसर्‍या बाजीरावांकडे आश्रयाला असणार्‍या मोरोपंतांच्या मनुला मातृसुख लाभले नाही. वयाच्या 3-4थ्या वर्षीच आई वारल्याने मनु नेहमी आपल्या वडिलांबरोबरच असे. नानासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे या दुसर्‍या बाजीरावांच्या दत्तक मुलांबरोबरच मनु ब्रह्मावर्त येथे वाढली. ब्रह्मावर्तातच तिथल्या कार्यशाळेतून, आखाड्यांमधून राणीने अश्र्वपरीक्षा, घोडेस्वारी, तलवारबाजी, बंदुक चालविणे, पिस्तुले, जांबीया चालवणे यांचेही शिक्षण घेतले. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या.

विवाह -

वयाच्या 7 व्या वर्षी शके 1764 च्या वैशाखात म्हणजेच 1842 साली मनुताई यांचा विवाह झाशी संस्थानचे अधिपति गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी थाटामाटात पार पडला. मोरोपंत तांबे यांच्या मनुताई विवाहित होऊन झाशीची राणी म्हणून संबोधल्या जाऊ लागल्या. विवाहानंतर त्यांचे नाव 'लक्ष्मीबाई' असे ठेवण्यात आले. 1851 मध्ये महाराणी लक्ष्मीबाई याना एक मुलगा झाला. पण दुर्दैवाने त्या मुलाचा तीन महिन्याच्या आतच मृत्यू झाला. त्यानंतर गंगाधरराव यांची तब्येत खालावत गेली. शेवटी गादीला वारस हवा म्हणून, नेवाळकर घराण्याच्या वंशातील वासुदेव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव यांना दत्तक घेऊन त्याचे नाव 'दामोदरराव' ठेवले. दत्तक विधि झाल्यानंतर 21 नोव्हेंबर 1853 रोजी दुपारी गंगाधररावांचा मृत्यू झाला. वयाच्या 18 व्या वर्षी राणी लक्ष्मीबाई यांच्यावर वैधव्याची कुर्‍हाड कोसळली.

लग्नानंतर ही मनूने आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमीत सुरू ठेवले होते. एवढेच नव्हे तर कनिष्ठ समजल्या जाणार्‍या सर्वसामान्य वर्गातील महिलांनाही तिने घोडेस्वारी, तलवारबाजीत पारंगत केले. या गोष्टीचा फायदा ब्रिटिशांनी झांशीवर केलेल्या हल्ल्याच्या वेळी झाला. घोडदळ-सैन्यातील महिलांचा वावर, दारुगोळ्याची ने-आण करणार्‍या महिला, एवढेच नव्हे तर तोफगोळ्यांची गोलंदाजी करणार्‍या महिला पाहून सर ह्यूज रोज हा इंग्रजांचा सेनापती आश्चर्यचकीत झाला होता. ही गोष्ट आहे 1857-58 ची.

इंग्रजांचा शिरकाव -

ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला. त्यात झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. झाशीच्या जनतेला उद्देशून 13 मार्च 1854 रोजी एक जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने तपस्वीनीचा अवतार टाकून तेजस्विनीचा अवतार धारण केला. ‘मेरी झांसी नही दूँगी’ अशी गर्जना करून तिने 1857 च्या संग्रामात उडी घेतली. 1857 मधील जानेवारीत सुरू झालेल्या स्वातंत्र्य युद्धाने 10 मे रोजी मीरत येथेही पेट घेतला. मीरतबरोबरच दिल्ली, बरेली पाठोपाठ झाशीही इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र झाली. झाशीतील इंग्रजांची सत्ता संपुष्टात आल्यावर राणी लक्ष्मीबाई यांनी 3 वर्षांनंतर तेथील सूत्रे हाती घेतली.

झाशीवर हल्ला -

चिडलेल्या इंग्रजांनी लक्ष्मीबाई यांना जिवंत पकडून आणण्यासाठी सर ह्यू रोज यांची नेमणूक केली. 20 मार्च 1858 रोजी सर ह्यू रोज यांच्या सैन्याने झाशीपासून 3 मैलांवर आपल्या सैन्याचा तळ ठोकला. लढाई सुरू झाली, झाशीच्या तोफा इंग्रजांची दाणादाण उडवू लागल्या. 3 दिवस सतत लढाई करूनही झाशीच्या किल्ल्यावर तोफा डागता येत नसल्याने सर ह्यू रोजने फितुरीचा मार्ग अवलंबला. अखेर 3 एप्रिल रोजी सर ह्यू रोजच्या सैन्याने झाशीत प्रवेश केला. त्यावेळी इंग्रजांची फळी तोडून लक्ष्मीबाई पेशव्यांची मदत मागण्यासाठी किल्ल्याबाहेर पडल्या. पेशव्यांनी सर्व परिस्थिति ओळखून राणी लक्ष्मीबाई यांना सर्व मदत करण्याचे ठरवले. मात्र झालेल्या लढाईत 24 मे रोजी काल्पी इंग्रजांनी ताब्यात घेतली. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई यांनी पुढे होऊन ग्वाल्हेर जिंकून पेशव्यांच्या हातात दिले.

मृत्यू -

16 जून रोजी सर ह्यू रोज हा ग्वाल्हेरला भिडला. 18 जूनला राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्यामुळे हताश झालेल्या इंग्रजांनी ग्वाल्हेरवर सर्व बाजूंनी एकदम हल्ला केला. या वेळी त्यांनी शरणागति न पत्करता शत्रूची फळी फोडून बाहेर जाण्याचे ठरवले. इंग्रज अधिकारी स्मिथ यांचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या ब्रिटिश दमाची फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. राणींचा निभाव दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर लागला नाही. त्यांचा घोडा एका ओढ्यापाशी अडला. घोडा काही केल्या ओढा ओलांडत नव्हता. तेथे इंग्रजांशी लढत असताना, राणी लक्ष्मीबाई रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांच्या डाव्या कुशीत तलवार घुसली, परंतु इंग्रज पुरुषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना ओळखू शकले नाहीत. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी राणीची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षीं मरण स्वीकारले. त्या शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

ब्रिटिशांनी राणींचा उल्लेख `हिंदुस्थानची 'जोन ऑफ आर्क’ असा केला. क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता ठरलेल्या या राणीवर अनेक काव्य, पोवाडे रचले गेले. राणी लक्ष्मीबाईंच्या ग्वाल्हेर येथील समाधिस्थानावर 1962 मध्ये त्यांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला. झाशीच्या राणीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची आठवण ठेवूनच नेताजी सुभाषचंद्रांनी 1943 च्या ऑक्टोबरमध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला ‘राणी झाशी रेजिमेंट’ असे नाव दिले.