Shivrajyabhishek Din 2020: शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये खास होत्या 'या' गोष्टी!
शिवराज्याभिषेक दिवस 2020 (Photo Credits: File Image)

शिवजयंती इतकाच शिवभक्तांसाठी खास आणि मोठी अभिमानाची तारीख म्हणजे 6 जून! शिवाजी महाराजांचा शालिवाहन शके 1596 ज्येष्ठ मासी शुद्ध त्रयोदशीला किल्ले रायगडावर (Fort Raigad) राज्याभिषेक (Shivrajyabhishek Sohala)  करण्यात आला. शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्रात स्थापन केलेल्या हिंदवी साम्राज्याला या राज्याभिषेक सोहळ्यामुळे खास दर्जा मिळाला. दरवर्षी शिवप्रेमी मोठ्या संख्येने आपल्या महाराजाला मुजरा करण्यासाठी रायगडावर दाखल होतात. शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दणक्यात सेलिब्रेशन करतात. यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त (Shivrajyabhishek Din)  रायगडावर एकत्र न जमण्याचं आवाहन खासदार संभाजी राजे यांनी केले आहे. पण घरच्या घरी या दिवसाचं सेलिब्रेशन नक्की केलं जाऊ शकतं. महाराष्ट्रात यंदा 6 जून दिवशी 346 वा शिवराज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din) पार पडणार आहे. मग त्याचं औचित्य साधत शिवरायांचा बाणा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी जाणून घ्या नेमकं 346 वर्षांपूर्वी झालेल्या या राज्याभिषेकाच्या सोहळयामध्ये काय झालं होत? Shivrajyabhishek Sohala 2020 Messages: शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त मराठी संदेश, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून शिवरायांना द्या मानवंदना!

 

कसा होता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा?

  • छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले होते मात्र प्रचलित राजनीतीनुसार त्याला मान्यता मिळविण्याचे सोपस्कार करणं आवश्यक होते त्यानुसार राज्याभिषेकाचा सोहळा आयोजित करण्यात आला.
  • ६ जून १६७४ हा राज्याभिषेकाच्या सोहळ्याचा मंगल दिवस म्हणून ठरला.
  • सार्वभौम स्वराज्याच्या नेत्याला विधिवत समाजमान्यता मिळणं आणि त्यामुळं राजनैतिक अधिष्ठान प्राप्त करणं हा राज्याभिषेक सोहळयाचा हेतू असतो.
  • राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले होते. तीन मण सोन्याचे म्हणजेच 56 हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले होते.
  • किल्ले रायगड याची हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख झाली आणि हा किल्ला राज्याभिषेकासाठी सजू लागला.
  • गागा भट्टांनी इतर ब्राम्हणांसमवेत शिवरायांचा राज्याभिषेक केला. यावेळेस गंगा नदीसह आठ महत्त्वाच्या नद्यांच्या पाण्याने शिवरायांचा जलाभिषेक झाला.
  • शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन सोन्याच्या पत्राने सजवले होते. यावर राजे बसले होते. राज्याभिषेकादरम्यान 16 सवाष्णांनी त्यांना ओवाळून त्यांची आरती केली. ब्राम्हणांनी मंत्रपठण केले तर प्रजेने आपले आशिर्वाद त्यांच्या रयतेच्या राजाला दिले.
  • शिवराज्याभिषेक सोहळ्याचे मुख्य पुरोहित गागाभट्ट यांनी शिवरायांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत त्यांचा उच्चार 'शिवछत्रपती’ म्हणून केला. अन शिवाजी शहाजी भोसले छत्रपती शिवाजी महाराज झाले.
  • कानपूर ते रायगड असा प्रवास करून कविराज भूषण देखिल महाराष्ट्रात दाखल झाले होते.
  • शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अनेक देशविदेशातून  मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. या सोहळ्यात हेन्री ऑक्सएन्डन (Henry Oxenden) हा इंग्रज अधिकारी रायगडावर उपस्थित असल्याची नोंद आहे.
  • राज्याभिषेकाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं. मुख्य प्रधान— मोरोपंत पिंगळे, पंत अमात्य— रामचंद्र बावडेकर, पंतसचिव— आण्णाजी दत्तो, मंत्री— दत्ताजीपंत, सेनापती— हंबीरराव मोहिते, सुमंत— जनार्दनपंत हणमंते, न्यायाधीश— बाळाजीपंत आणि पंडितराव म्हणून रघुनाथराव यांची नेमणूक करण्यात आली.

दरम्यान शिवप्रेमींमध्ये शिवाजी महाराजांचा हा शिवराज्याभिषेक सोहळा नेमका साजरा कधी करायचा याबाबतही दुमत आहे. काही जण तिथीनुसार हा सोहळा साजरा करतात तर काही जण तारखेनुसार 6 जूनला त्याचं सेलिब्रेशन करतात. यंदा तिथीनुसार, 4 जून दिवशी शिवराज्याभिषेक दिन होता.