पितृ पक्ष (Photo Credit: Wikimedia Commons)

हिंदू धर्मीय भाद्रपद कृष्ण पंधरवडा हा पितृपंधरवडा (Pitru Pandharvada) म्हणून पाळतात. तिथी नुसार श्राद्ध करण्याची या दिवशी पद्धत असते. या पंधरवड्याची सांगता सर्वपित्री अमावस्या च्या दिवशी केली जाते. त्यामुळे भाद्रपद कृष्ण अमावस्या ही विशेष महत्त्वाची असते. यंदा सर्वपित्री अमावस्या ही 25 सप्टेंबर दिवशी आहे. धार्मिक मान्यतांनुसार पितृपंधरवड्याच्या काळात यमलोकातून मृत्यूलोकी जाण्यासाठी पितरांना मुभा असते. त्यामुळे त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोहचवून स्मरण करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे.

सर्वपित्री अमावस्येचं महत्त्व

ज्या मृत व्यक्तींची निधनाची तिथी ठाऊक नाही किंवा घरातील एकाच दिवशी सार्‍या मृत पूर्वजांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर त्यासाठी सर्वपित्री अमावस्येला पितरांचे श्राद्ध ठेवलं जातं.

सर्वपित्री अमावस्या तिथी वेळ

सर्वपित्री अमावस्येच्या तिथीची सुरूवात 24 सप्टेंबरच्या उत्तर रात्री 3 वाजून 12 मिनिटांनी होणार आहे तरसमाप्ती 25 सप्टेंबरला उत्तररात्री 3 वाजून 23 मिनिटांनी होणार आहे.

सर्वपित्री अमावस्या दिवशी सकाळी लवकर उठा. आंघोळ करा. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. पितरांच्या तर्पणासाठी सात्विक जेवण करा. त्यानंतर त्याची केळीच्या पानावर वाढी काढा. यामध्ये मिक्स भाज्यांचा समावेश केला जातो. जेवनाचं पान घराच्या खिडकीत, मोकळ्या जागी, टेरेसवर ठेवले जाते. कावळ्याच्या रूपाने पितर त्यांचा स्वीकार करतो अशी धारणा आहे. यादिवशी पितरांच्या स्मरणार्थ दिवा लावण्याची देखील पद्धत असते.

पितृपक्षाच्या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये सामान्यपणे नव्या कामाची सुरूवात, शुभ कार्य, नव्या गोष्टींची खरेदी टाळली जाते. तसेच काही घरात चिकन, मटण यासारखा मांसाहार देखील व्यर्ज असतो. हे देखील नक्की वाचा: पितृ पंधरवड्यात श्राद्धाच्या दिवशी पिंडदानासाठी कावळ्याला का दिले जाते महत्व, जाणून घ्या कारण.

पुराणा सांगितलेल्या एका कथेनुसार, यमराज दरवर्षी श्राद्धाच्या काळात सार्‍या जीवांना मुक्त करतो. या काळात ते आपल्या प्रिय व्यक्तींकडे जाऊ शकतात, तर्पण ग्रहण करू शकतात. वडील, आजोबा आणि पणजोबा हे तीन देवतांसमान मानले जातात. त्यानुसार वडीलांना वसू समान, आजोबांना रूद्र देवतांसमान आणि पणजोबांना आदित्य देवता समान मानलं जातं.

(टीप: वरील लेख हा केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. यामधील बाबींची लेटेस्टली पुष्टी करत नाही. कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा, अंधश्रद्धा पसरवण्याचा लेटेस्टली मराठीचा उद्देश नाही. )