हिंदू धर्मामध्ये भाद्रपद कृष्ण पक्षाच्या पंधरवड्याला पितृपंधरवडा (Pitrupandharavada) असं म्हटलं जातं. या पंधरवड्याची सांगता सर्वपित्री अमावस्या या दिवसाने होते. त्यामुळे या अमावस्येला विशेष महत्त्व आहे. यंदा भारतामध्ये 17 सप्टेंबर दिवशी सर्वपित्री अमावस्या (Sarv Pitru Amavasya) आहे. हिंदू धर्मामधील काही मान्यतांनुसार, प्रत्येक अमावस्येला पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे. मात्र पितृ पंधरवडामध्ये हे विशेष पाळले जाते कारण या 15 दिवसांच्या काळात यमलोकातून मृत्यूलोकी जाण्यासाठी पितरांना परवानगी असते. त्यामुळे त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोहचवून स्मरण करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळेच सर्वपित्री अमावस्येला मोक्ष अमावस्या देखील संबोधले जाते. Pitru Paksha 2020: यंदा 17 सप्टेंबर दिवशी पितृपंधवड्याची सांगता होऊनही शारदीय नवरात्र महिनाभर पुढे का जाणार?
सर्वपित्री अमावस्या महत्त्व काय?
सर्व साधारणपणे पंधरवड्यातील ज्या तिथीला व्यक्तीचा मृत्यू होतो त्या दिवशी/ तिथीला पितरांचे श्राद्ध ठेवले जाते. मात्र तुम्हांला जर ती तिथी ठाऊक नसेल तर तुम्ही सर्वपित्री अमावस्येलादेखील श्राद्ध करू शकता. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशीचं श्राद्ध हे कुटुंबातील सार्या पूर्वजांसाठी एकत्र केले जाऊ शकते. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. तसेच सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी त्यांचं श्राद्ध करण्याची पद्धत आहे. ज्यांच्या मृत्यूच्या दिवशी अमावस्या, पौर्णिमा किंवा चतुर्दशी ची तिथी होती. या दिवसाला म्हणूनच सर्व पित्री मोक्ष अमावस्या म्हणून देखील ओळखलं जातं.
सर्वपित्री अमावस्या 2020 तिथी तारीख आणि वेळ
सर्वपित्री अमावस्या 2020 तिथी तारीख - 17 सप्टेंबर 2020
सर्वपित्री अमावस्या 2020 तिथी वेळ - 16 सप्टेंबरला संध्याकाळी 19:58:17 पासून सुरू ते 17 सप्टेंबरला 16:31:32 ला समाप्ती होणार आहे.
सर्वपित्री अमावस्या दिवशी काय कराल?
सर्वपित्री अमावस्या दिवशी सकाळी लवकर उठा. आंघोळ करा. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. पितरांच्या तर्पणासाठी सात्विक जेवण करा. त्यानंतर त्याची केळीच्या पानावर वाढी काढा. यामध्ये मिक्स भाज्यांचा समावेश केला जातो. जेवनाचं पान घराच्या खिडकीत, मोकळ्या जागी, टेरेसवर ठेवले जाते. कावळ्याच्या रूपाने पितर त्यांचा स्वीकार करतो अशी धारणा आहे. यादिवशी पितरांच्या स्मरणार्थ दिवा लावण्याची देखील पद्धत असते.
(टीप: वरील लेख हा केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा, अंधश्रद्धा पसरवण्याचा लेटेस्टली मराठीचा उद्देश नाही. )