गणपती बाप्पाला अलविदा केल्यानंतर आता हिंदू धर्मियांमध्ये आज पासून पितृपंधरवड्याला (Pitrupandharvada) सुरूवात झाली आहे. दरम्यान पितरांचे स्मरण करण्यासाठी पुढील 15 दिवसांचा काळ असतो. आणि सर्वपित्री अमावस्येनंतर (Sarvapitri Amavasya) भारतामध्ये सणांची धामधूम पुन्हा सुरू होते. पितृपक्ष संपला की शारदीय नवरात्र (Sharadiya Navratri) येते. मात्र यंदा पितृपक्ष (Pitrua Paksha) संपल्यानंतर महिन्याभराने शारदीय नवरात्र असेल. यंदा असं काय आहे? ज्यामुळे पितृ पक्षानंतर तब्बल महिन्याभराने नवरात्रोत्सव सुरू होणार? हे जाणून घेण्यासाठी ही माहिती नक्की जाणून घ्या. Pitru Paksha 2020: पितृ पक्षाला यंदा 2 सप्टेंबर पासून सुरूवात; जाणून घ्या पितृपंधरवड्यात काय कराल काय टाळाल?
165 वर्षानंतर आलेल्या दुर्मिळ योगा-योगामध्ये यंदाचं वर्ष आहे. यावर्षी पितृपंधरवडानंतर अधिक महिना आल्याने शारदीय नवरात्र लांबली आहे. पितृ पक्षाची सुरूवात यंदा 2 सप्टेंबर पासून होईल तर 17 सप्टेंबर दिवशी सर्वपित्री अमावस्येला पितृपक्ष संपणार आहे. या 15 दिवसांमध्ये पूर्वजांचं स्मरण करून त्यांचं तिथीनुसार श्राद्ध घालण्याची पद्धत आहे.
पितृपक्ष आणि नवरात्र 2020 मध्ये महिन्याभराचं अंतर का?
पितृपक्षासोबतच हिंदू धर्मियांचा चातुर्मासाचा काळ देखील संपतो. मात्र यंदा 2020 हे लीप वर्ष असल्याने शारदीय नवरात्र लांबली आहे. तसेच अधिक महिना आल्याने 165 वर्षांनी लीप वर्ष आणि सोबतीला अधिक मास असल्याने शारदीय नवरात्र महिनाभर पुढे गेली असून ऑक्टोबर महिन्यात घटस्थापना होईल. त्यामुळे 17 सप्टेंबरला पितृपक्ष संपला तरीही घटस्थापना 17 ऑक्टोबरला होईल.
देवशयनी ते देव उठनी एकादशी हा चार महिन्यांचा काळ चातुर्मास असतो. या काळात भगवान विष्णू निद्रावस्थेमध्ये असतात. देव उठनी एकादशीला देव निद्रेमधून उठल्यानंतर पुन्हा शुभ कार्याची सुरूवात होते. भारतामध्ये इथपासूनच पुढे विवाह कार्य सुरू केली जातात. त्यामुळे यंदा चातुर्मास संपण्यासाठी 25 नोव्हेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे.
(टीप: वरील लेख हा केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहला आहे. कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा, अंधश्रद्धा पसरवण्याचा लेटेस्टली मराठीचा उद्देश नाही. )