भारतामधून ब्रिटिशांची सत्ता उलथून लावण्यासाठी पेटलेल्या 1857 च्या बंडामध्ये राणी लक्ष्मीबाई (Rani Laxmi Bai)यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अदम्य साहस दाखवत त्यांनी रणांवर पराक्रम जागवला. आज राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म दिवस (Rani Laxmi Bai Jayanti). 19 नोव्हेंबर 1828 दिवशी जन्मलेल्या राणी लक्ष्मीबाई आजही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. आज राणी लक्ष्मीबाईंच्या जयंती निमित्त जाणून घेऊ त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी! राणी लक्ष्मीबाई जन्मदिन विशेष : आपल्या पराक्रमाचा ठसा पूर्ण जगताच्या इतिहासावर उमटवणाऱ्या वीरांगनेची गाथा.
राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंती निमित्त खास गोष्टी!
- राणी लक्ष्मीबाई या नावाने त्या प्रसिद्ध असल्या तरीही त्यांचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. वाराणसी मध्ये एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता.
- वयाच्या चौथ्या वर्षीच त्यांच्या आईचं छत्र हरपलं होतं. तर लाडाने त्यांचं नाव 'मनू' असं संबोधले जात होते.
- घरातच त्यांचे शिक्षण झाले होते. मात्र त्यांना घोडेस्वारी, नेमबाजी देखील येत होती.
- झासीचे राजा गंगाधर राव यांच्याशी त्यांचा वयाच्या 14 व्या वर्षी विवाह झाला होता. लग्नानंतर मणिकर्णिकेचे नाव लक्ष्मी बाई असं ठेवण्यात आले.
- लक्ष्मीबाई आणि गंगाधर राव यांनी अपत्य दत्तक घेऊन त्याचं नाव दामोदर राव असं ठेवलं.
- ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसीने हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला व दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन केले. त्या वेळीच स्वाभिमानी लक्ष्मीबाईंनी ‘मेरी झांसी नही दूँगी’ अशी गर्जना करून 1857 च्या संग्रामात उडी घेतली.
- इंग्रजांनी लक्ष्मीबाई यांना जिवंत पकडून आणण्यासाठी सर ह्यू रोज यांची नेमणूक केली. 3 एप्रिल 1858 ला सर ह्यू रोजच्या सैन्याने झाशीत प्रवेश केला. या लढाईत 24 मे रोजी काल्पी इंग्रजांनी ताब्यात घेतली. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई यांनी पुढे होऊन ग्वाल्हेर जिंकून पेशव्यांच्या हातात दिले.
- 16 जून रोजी सर ह्यू रोज हा ग्वाल्हेरला भिडला. या लढाईत स्वतः रणभूमीवर उतरलेल्या राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण आले. ब्रिटिशांची दोन हात करताना त्या घायाळ झाल्या. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
ब्रिटिशांनी राणींचा उल्लेख `हिंदुस्थानची 'जोन ऑफ आर्क’ असा केला. तर झाशीच्या राणीने स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची आठवण ठेवूनच नेताजी सुभाषचंद्रांनी 1943 च्या ऑक्टोबरमध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या स्त्री शाखेला ‘राणी झाशी रेजिमेंट’ असे नाव दिले.