श्रावण महिन्यातील पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा (Narali Purnima) अर्थात राखी पौर्णिमा (Rakhi Purnima) म्हणून साजरी केली जाते. रक्षाबंधन (Raksha Bandhan) म्हणून ओळखला जाणारा हा सण यंदा 11 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. बहिण-भावाच्या नात्यामधील जोडवा जपण्यासाठी रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. मागील दोन वर्ष कोरोना संकटामुळे असलेली सारी बंधनं आता दूर झालेली असल्याने पुन्हा पूर्वीप्रमाणे बहिण-भावंडं हा सण साजरा करू शकणार आहेत. मग यंदा रक्षाबंधन निमित्त तयारीला लागा.
रक्षा बंधनाच्या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या हातात राखी बांधते. बहिणी औक्षण केल्यानंतर भाऊ तिला भेट देखील देतो. त्यामुळे बहिण-भावाच्या नात्यातील जिव्हाळा जपणारा हा दिवस मोठा कौतुकाचा आणि श्रावण महिन्यातील सणांच्या रेलचेलीतील महत्त्वाचा दिवस आहे. हे देखील नक्की वाचा: Shravan Mehndi Design: श्रावणमध्ये येणाऱ्या खास सणांसाठी हटके मेहेंदी डिझाईन, झटपट होईल काढून, पाहा व्हिडीओ .
राखीपौर्णिमा किंवा रक्षाबंधन याचं नेमकं महत्त्व काय?
पुराणात राखीपौर्णिमेच्या अनेक कथा सांगितल्या आहेत. एकदा देव आणि दानवांचे युद्ध सुरु असताना देवांचा पराभव होऊ लागला. त्यावेळेस देवांचे गुरु बृहस्पती यांनी श्रावणी पौर्णिमेला इंद्राच्या हातात अपराजिता नावाचे कवच बांधले त्यामुळे तो ती लढाई जिंकला. राक्षसांचा राजा बली याला दैत्यगुरु शुक्राचार्यांनी राखी बांधली व त्यामुळे देवांशी झालेल्या एका लढाईत तो जिंकला अशी कथा सांगितली जाते. आणखी एक अशी कथा आहे की, विष्णुने वामनावतार घेऊन बलिराजाला पाताळात ढकलले या पापामुळे विष्णुला बलिराजाच्या वाड्यावर द्वारपाल म्हणून राहावे लागले. त्यावेळेस नारदमुनींनी सुचवलेल्या युक्तीनुसार लक्ष्मी देवीने बलिराजाला राखी बांधली आणि बहिणीला परतभेट द्यायला हवी म्हणून बलिराजाने विष्णुला द्वारपाल होण्यापासून मुक्त केले. इंद्र जेव्हा वृत्रासुराशी लढायला गेला तेव्हा इंद्राणीने त्याच्या हातात राखी बांधली होती. त्यामुळे पूर्वी राजा लढाईला निघाला की पुरोहित त्याच्या हातात राखी बांधत असतं. असा हा रक्षाबंधनाचा सण बहीण-भावाच्य नात्यात प्रेमाचा बंध घट्ट करण्यासाठी साजरा केला जातो.
रक्षाबंधन 2022 मुहूर्त आणि तिथी वेळ
महाराष्ट्रात यंदा श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट दिवशी 10 वाजून 40 मिनिटांनी सुरू होणार असून 12 ऑगस्ट दिवशी त्याची सांगता 7 वाजून 6 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे या दिवसभरात तुम्ही राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकाल.
राखी बांधण्याची योग्य पद्धत
-राखी चे तबक तयार करताना त्यात हळद-कुंकु, दिवा,तांदुळ आणि राखी घ्या.
- भावाला करंगळीच्या बाजुच्या बोटाने टिळा लावा. व त्याटिळ्यावर तांदळाच्या अक्षता लावा. याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
- शक्य असल्यास सोन्याच्या किंवा चांदिच्या अंगठी किंवा नाण्याने भावाला ओवाळा. ओवाळताना डावी कडुन उजवीकडे ओवाळा.
- भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधा आणि गोड भरवा.
राखी देखील आता आकर्षणाचा भाग झाली आहे. त्यामुळे बाजारात ट्रेंड नुसार विविध आकारात, स्वरूपात राख्या उपलब्ध आहेत. ऑनलाईन माध्यमातूनही राखीची खरेदी करता येऊ शकते त्यामध्येही भन्नाट प्रकार बघायला मिळतात.
टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली पुष्टी करत नाही.