Marathi Patrakar Din 2021: 6 जानेवारी हा दिवस 'मराठी पत्रकार दिन' का साजरा केला जातो?
Journalist Day HD Images Wishes (Photo Credits: File)

6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन (Marathi Patrakar Din) म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. 'दर्पण' या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे 'बाळशास्त्री जांभेकर' (Balshatri Janbhekar) यांचा जन्मदिवस आहे. 6 जानेवारी 1812 ला कोकणात एका सामान्य घरात जन्माला आलेल्या बाळशास्त्री यांचे जीवनमान अवघ्या 34 वर्षांचे होते. पण त्यांच्या विचारांचा ठेवा, कार्याची पद्धत आणि समाजात प्रबोधन घडवून आणण्यात मोलाचा वाटा आहे. बाळाशास्त्रींचा जन्मदिवस आणि त्यांनी मुहूर्तमेढ रोवत सुरू केलेल्या पत्रकारितेतून पहिलं मराठी दैनिक देखील 6 जानेवारीला प्रसिद्ध झाल्याने हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मग आजच्या 'मराठी पत्रकार दिनी' जाणून त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी! नक्की वाचा: Journalist Day HD Images: मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा Wishes, Greetings, Messages, WhatsApp Status च्या माध्यामातून देऊन साजरा करा आजचा पत्रकारिता दिन.

बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी

  • 19 व्या शतकाच्या सुरूवातीला जेव्हा भारतामध्ये ब्रिटीश राजवटीची सुरूवात झाली होती तेव्हा त्या काळात बाळशास्त्री जांभेकर हे विद्याविभुषित, पंडीत व्यक्तिमत्त्व काम करत होते.
  • जेम्स ऑगस्टस हिकीच्या इंग्रजी 'बेंगॉल गॅझेट' या साप्ताहिकानंतर बाळशास्त्रींनी 50 वर्षांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं.
  • दर्पण 6 जानेवारी 1832 ला प्रसिद्ध झाला आणि अवघ्या 20 वर्षांच्या पण पंडीत असणार्‍या बाळशास्त्री जांभेकरांनी त्याच्या संपादकपदाची धुरा सांभाळली.
  • इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे दर्पण हे पहिले वृत्तपत्र होते. या अंकात दोन स्तंभ होते. उभ्या मजकुरात एक स्तंभ मराठी आणि दुसरा इंग्रजी भाषेत असायचा. मराठी मजकूर सर्वसामान्य जनतेसाठी होता तर राज्यकर्त्यांनाही कळावंं वर्तमान पत्रामध्ये काय आहे यासाठी त्याच्या बाजूला  इंग्रजी मजकूर देखील होता.
  • दर्पण साडेआठ वर्ष चालला. नंतर जुलै 1840 ला त्याचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला होता.
  • बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले. समाजातील वर्ण व्यवस्था, जातीभेद, स्त्री दास्य, सती, अस्पृश्यता, बालविवाह यांवर त्यांनी दर्पणच्या माध्यमातून लिखाण केल्याने त्यांना आद्य समाजसुधारकही म्हटलं जाऊ लागले.
  • संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते सोबतच ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषांचीही त्यांना जाण होती. भाषांसोबतच विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र व सामान्य ज्ञान या विषयांचाही अभ्यास असल्याने त्यांनी पुढे संबंधित विषयाशी निगडीत मासिकांमध्येही काम केले.

भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता असताना त्या सत्तेविरूद्ध उभं राहून देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे. सोबतीने सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे हे काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व बाळशास्त्री जांभेकरांचं निधन मुंबई मध्ये 1846 साली झाले. तेव्हा ते 34 वर्षांचे होते.