Maharashtra Day 2019: 1 मे रोजी सर्वत्र महाराष्ट्र राज्याच्या स्थापन दिवस म्हणून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो. या दिवशी 1960 रोजी तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्यासाठी मुहूर्तमेढ रोवली गेली होती. तर पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश देऊन नव्या महाराष्ट्राची जबाबदारी सोपविली. महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठ्या प्रमाणात लाभला आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी दिली जाते. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनसुद्धा करण्यात येते.
तर महात्मा गांधीजी यांनी कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दात महाराष्ट्राचे वर्णन केले आहे. त्याचसोबत 1 मे आंतरराष्ट्रीय कामगर दिन म्हणून सुद्धा ओळखला जातो. देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असताना द्विभाषिक राज्याचे एक शक्तीशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुध्दीवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेशएकत्र आणण्याची कल्पना मांडली. एस.एम.जोशी, आचार्य प्र.के.अत्रे, कॉ.श्रीपाद अमृत डांगे, सेनापती बापट, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक जण नवमहाराष्ट्रासाठी एक झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले.महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे.
महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला.
देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच भाषावर प्रांतरचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेचे महत्त्व महात्मा गांधींपासून सर्वांनी आग्रहाने प्रतिपादित केले होते. पुढे राज्य पुनर्रचनेतून निर्माण झालेल्या असंतोषात महाराष्ट्राचे एकशे पाच हुतात्मे बळी पडले.तर महाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात प्रगती केली आहे.