Lokmanya Tilak 99th Death Anniversary 2019: कसा होता टिळकांचा पत्रकारिता क्षेत्रातील प्रवास, जाणून घ्या सविस्तर
Lokmanya Tilak (Photo Credits: FliCkr)

Lokmanya Tilak Death Punyatithi: 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक (Lokmanya Bal Ganagadhar Tilak) यांची आज 99 वी पुण्यतिथी. लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. टिळकांच्या जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. तर त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला.

लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शाळेत केवळ शेंगांची टरफले टाकण्याच्या मुद्द्यावरून आपल्या शिक्षकांनी 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही. असे स्पष्टपणे निक्षून सांगणारे लोकमान्य टिळक आजही सर्वांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या याच निर्भीड, सडेतोड, स्पष्टवक्तेपणा यामुळे त्यांची ओढ ही आपोआपच पत्रकारितेकडे वळाली.

कसा होता टिळकांचा पत्रकारितेचा प्रवास:

टिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकार्‍यांच्या मदतीने 1881 साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणार्‍या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत.

तर मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.

हेही वाचा- Lokmanya Tilak Jayanti 2019: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 163 व्या जयंती निमित्त जाणून घ्या या 10 खास गोष्टी

सुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी ' चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी' त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी ' चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी ' चा आत्मा होता.

टिळकांची प्रसिद्ध अग्रलेख:

1. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय

2. उजाडले पण सूर्य कुठे आहे

3. टिळक सुटले पुढे काय

4. प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल

5. टोणग्याचे आचळ

6. हे आमचे गुरूच नव्हेत

7. बादशहा ब्राह्मण झाले

1881 ते 1920 या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी 513 अग्रलेख लिहिले. त्यांच्या अग्रलेखांमुळे त्यांनी अनेकदा इंग्रजांनी कैद केले. पण निर्भिड विचारांचे लोकमान्य टिळक इंग्रजांपुढे नमले नाही. त्यांनी आपला लढा सुरुच ठेवला. अशा या थोर स्वातंत्र्यसेनानी, लढवय्या, निर्भीड, स्पष्टवक्त्या थोरपुरुषाला लेटेस्टलीचा सलाम.